‘केंद्र सरकारला सांगा, राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही!’ नितेश राणेंचा टोमणा

Nitesh Rane

मुंबई :- ‘तौक्ते’ चक्रीवादळात (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली. यावर भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली – उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असे केंद्राला सांगा, असा टोमणा मारला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे म्हणालेत की, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आलेल्या आपत्तीच्या वेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखे केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा.

कोकणाला पॅकेज द्या

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने कोकणाला पॅकेज द्यावे. त्यामुळे कोकणाला आधार मिळेल. केंद्र सरकारला देश चालवायचा आहे. राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी आणि ती द्यावीही. गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळावेळी राज्य सरकारने २५ कोटींची मदत जाहीर केली. पण अजून एकही दमडी आली नाही; तसे यावेळी होता कामा नये. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, पण ती मदत मिळेल असे मला वाटत नाही. काल मुख्यमंत्री कोकणातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळून मुंबईला परत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्वांत जास्त नुकसान झाले तिथे गेलेच नाही!

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? असा सवालही राणे यांनी केला. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का? मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितले? मालवणमध्ये वायरी गावात लोक सकाळी ७ वाजल्यापासून त्यांची वाट पाहात होते. तिथे त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला? कुणाचे अश्रू पुसले? मुख्यमंत्री हवाई दौरा न करता जमिनीवर उतरले, त्याचा फायदा काय झाला आम्हाला? असे सवाल त्यांनी केले. मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वांत जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. याला दौरा म्हणू शकता का? असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्री एखाद्या भागात येतात तेव्हा जनतेच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा असतात. हे दुःख वाढवणारे मुख्यमंत्री आहेत, दुःख पुसणारे नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

लिपस्टिक नव्हे, पावडर दौरा !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोकणात फिरत होते. मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तरं द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा केला का? घराबाहेर पडून स्वतःच्या कपड्याची इस्त्री मोडू न देता ते परत घरी गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा असा दौरा कुणी पाहिला नसेल, असे सांगतानाच मी म्हणालो होतो की, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा लिपस्टिक दौरा आहे. पण, हा त्यापेक्षाही भयंकर असा पावडर दौरा होता. चेहऱ्याला पावडर लावतो तसा!

आमच्यावरचे प्रेम कमी झाले नसावे

ज्या ‘चिवला’ बीचवर मुख्यमंत्री उभे राहिले तिथे समोरच राणे साहेबांचे घर आहे. मुख्यमंत्र्यांचे आमच्यावरचे प्रेम कदाचित आजही कमी झालेले नाही. मुख्यमंत्री खूप दिवस इथे राहिले आहेत, आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना? असा टोमणा राणे यांनी मारला.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे : नितेश राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button