सट्टेवाल्यांकडून वसूल केलेली खंडणी वाझे पुढे देतो कोणाला? नितेश राणेंचा धमाका

Sachin Waze-Nitesh Rane

मुंबई :- मुंबई पोलिसमधील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) क्रिकेटच्या सट्टेवाल्यांकडून खंडणी वसूल करत होते आणि त्यातील हिस्सा एक व्यक्ती घेत होता, असा खळबळजनक आरोप भाजपाचे (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला असून याची चौकशी एनआयएने करावी, अशी मागणी केली आहे.पत्रपरिषदेत नितेश राणे यांनी आरोप केला की, सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती.

त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता तुमचे लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला आहे. धाड पडू द्यायची नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझे देत होते, असा आरोप राणे यांनी केला.

वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचे काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस आहे वरुण सरदेसाई. वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यांचे काय बोलणे झाले याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली.

हा सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हा फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही. वाझेंना अटक करण्यात आली आहे या निमित्ताने सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. वाझे-वरुण सरदेसाईंची काय लिंक आहे त्याचाही तपास करण्यात यावा, सर्वच बाहेर येईल, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? नितेश राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER