‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, नितेश राणेंचा दावा

सिंधुदुर्ग :- केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा (NCP) विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार (Sharad Pawar) हमारे साथ हैं’, असं सूचक विधान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

विधेयकाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठलाही विरोध केलेला दिसून आला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.

कृषी विधेयकावरून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार फटकेबाजी केली. नितेश राणे म्हणाले, जेव्हा हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं तेव्हा महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष मग राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, आपण जर त्यांच्या नेत्यांची भाषणं व्यवस्थित ऐकली तर असं लक्षात येईल की संजय राऊतांनी (Sanjay Raut) तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांना माहितीच नाही की त्यांच्या पक्षाला नेमकं जायचंय कुठं, किंबहुना शेती कुठे करतात आणि कशी करतात हे त्यांच्या नेतृत्वाला माहिती नाही. शेतीवर ते कधीही भूमिका घेत नाहीत.

काँग्रेस कृषी विधेयकाला करत असलेल्या विरोधावर बोलताना नितेश म्हणाले, “ या विधेयकाच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करतोय पण स्वत: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे २०१३ ला विधान आहे की आम्ही जर सत्तेत आलो की बाजार समित्या रद्द करू. तसंच २०१९ च्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी तेच आश्वासन दिलं होतं. ते जे करणार होते तेच आताच्या सरकारने पाऊल उचललं आहे मग त्यांचा आता विरोध कशासाठी? की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून ते विरोध करत आहेत का?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संपूर्ण देशभरातला शेतकरी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. काही मोजकी राज्य सोडली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विश्वास की आम्हाला मोदींनी न्याय दिला आहे. . केंद्र सरकारने आमच्या भविष्याला आकार दिलाय, त्यामुळे विरोधकांचे आंदोलन निरर्थक आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER