संभाजी भिडे सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

nitesh-rane-criticise-sambhaji-bhide

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या तरुणांना सरकारने तुरुंगात डांबले. आंदोलनावेळी याच तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले . मात्र आता आरक्षणाचा प्रश्न मिटला तरी अद्यापही या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत . यातील कित्येक जण हे सुशिक्षित आणि उच्च पदावर कार्यरत आहेत . दुसरीकडे सरकारतर्फे तडकाफडकी संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेतले जातात. ते सरकारचे जावई आहेत का, असा सवाल आमदार नितेश राणेंनी विचारला आहे.

लातूर येथील मराठा समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजाच्या क्रोधाचा सरकारला पुन्हा सामना करायचा आहे, असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे . संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातात; पण मराठा युवकांवरील गुन्हे तसेच आहेत. याचा मराठा समाजाने विचार केला पाहिजे. तसेच शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे ओरिजनल मराठा नाहीत तर ते चायनीज मॉडेल आहेत, अशी टीकाही राणे यांनी केली .

आगामी लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर आता आमदार-खासदार तुमच्याकडे मते मागायला येतील . तेव्हा तुम्ही त्यांना उलट सवाल करून मराठा समाजाचे म्हणून काय केले, असा प्रश्न विचारायचा . मराठा तरुणांना तुरुंगात डांबले जात असताना तुम्ही काय करीत होता? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांच्यावर करायची, असा सल्लाही नितेश राणे यांनी मराठा समाजातील नागरिकांना दिला . यावेळी मराठा समाज गंगापूर तालुक्याच्यावतीने नितेश राणे यांचा ‘स्फूर्ती नायक’ या पुरस्काराने गौरवण्यात आला .