निरोगीपणानंच पाडवा आणि वर्षही गोड जाईल…

Uddhav Thackeray

राज्यातलं तीन पायांचं सरकार तीन बाजूंना तीन तोंडं, अशा पद्धतीनं कारभार करत असल्यानं लॉकडाऊन लावायचं, यावर एकमत झालं तरी तो कसा असावा, यावर मात्र एकमत होत नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन पूर्ण असावा की नाही, थोडा वेळ तरी लोकांना घराबाहेर यायची मुभा द्यावी का, दुकानं रोजच्या रोज तास दोन तासांसाठी खुली ठेवावीत की नाही, उत्पादन क्षेत्राला कामकाज सुरू ठेवायला परवानगी दिली तर मग किरकोळ विक्री आणि घाऊक विक्रीच्या बाजारपेठांचं काय करायचं, हातावरचं पोट असलेल्या पथारीवाले, स्टॉलवाले, भाजीवाले, फळविक्रेते या सर्वांचं काय करायचं…

एक ना दोन, विविध प्रकारचे प्रश्न राज्यासमोर म्हणजे राज्यकर्त्यांसमोर आ वासून उभे आहेत. त्यात जे काय करायचे ते करा पण सर्वसामान्यांना त्याची कल्पना द्या आणि हातावरचे पोट असलेल्यांची काही तरी व्यवस्था करा, या विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आग्रही प्रतिपादनानंतर सर्वपक्षीय बैठकीतही अनेकांनी त्याला रुकार दर्शवला होता. त्यामुळे गेले दोन दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थचक्राची घडी विस्कटणार नाही आणि हातावरचे पोट असलेल्यांनाही काही दिलासा देता येईल का, या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर मँरेथॉन बैठका घेत आहेत.

आपल्या वडिलांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी उद्धवजी मुख्यमंत्री झालेत खरे, पण त्यांच्या चुलतभावाने वर्णन केल्याप्रमाणे ते राज्यावर न येता, त्यांच्यावरच राज्य आलेय की काय, असं वाटण्यासारखी स्थिती आहे. चारी बाजूंनी संकटात सापडलेल्या अभिमन्यूसारखी मुख्यमंत्री ठाकरे यांची स्थिती झाली आहे. एकीकडे करोनाचे महासंकट, दुसरीकडे आघाडीतल्या घटक पक्षांनीच केलेली कोंडी, अर्थव्यवस्थेचं चक्र गाळात रुतून बसण्याची निर्माण झालेली शक्यता, मुंबई-पुणे या एरवी राज्याला अभिमान वाटावा अशा शहरांमध्येच वाढत असलेला करोना आणि त्यामुळे देशपातळीवरच नव्हे तर जगात महाराष्ट्राची होत असलेली नाचक्की, अशा संकटांच्या चक्रीवादळात राज्यातलं सरकार सापडलेलं आहे. राज्यातलं हे तीन पायाचं सरकार सत्तेवर येण्यात मोलाची भूमिका बजावलेले शरद पवारसाहेब (Sharad Pawar) रुग्णालयात उपचार घेताहेत.

अशा बिकट परिस्थितीतच सचिन वाझेप्रकरण आणि माजी गृहमंत्र्यांची सीबीआयकडून सुरू होत असलेली चौकशी, अशा कचाट्यात ठाकरे सरकार सापडलेले आहे. मुळात राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची गरज आहे, या निष्कर्षाला स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आलेलेच हेत पण गुढी पाडवा आणि आंबेडकर जयंती पार पडल्यानंतर म्हणजेच बुधवारनंतर लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता आहे. त्याबद्दलची रीतसर घोषणा कदाचित बुधवारी दुपारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर होऊ शकते.

तुम्ही यशस्वी होत असता तेव्हा तुमच्या सगळ्याच निर्णयांचं कौतुक होत असतं आणि तुम्ही अपयशी होत असता, तेव्हा तुमच्या चांगल्या निर्णयांनाही टीकेचं धनी व्हावं लागतं. मुळात उद्धव ठाकरे धडाकेबाज पद्धतीनं निर्णय घेणारे लोकनेते नव्हेत. पण त्यांची डायनामिक, डँशिंग अशी इमेज नसली तरी त्यांचा भल्याभल्यांना येत नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. राजकीयदृष्ट्या त्यांना न मोजणं कदाचित राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही महागात पडू शकेल, इतपत चांगले राजकारणी उद्धव ठाकरे नक्कीच आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेतानाही कदाचित ते खूप प्रभावी भाषण करू शकणार नाहीत पण ते निर्णय ठामपणेच घेतील, अशी आशा करायला हरकत नाही.

करोनानं महाराष्ट्राला पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं आहे. त्यामुळे पदरी पडलं आणि पवित्र झालं, या भावनेने आपण सर्वांनी मायबाप सरकार जो काही निर्णय घेईल, तो आपल्या सर्वांच्या हिताचा आहे, यावर विश्वास ठेवून आपापल्या घरीच राहू या आणि करोनाविषयक सारे नियम पाळून करोनाच्या निर्जीव विषाणूला पसरण्यापासून थांबवू या. यंदाच्या गुढी पाडव्याचा प्रत्येकानं स्वतःच्या जिवाची काळजी घ्या, निरोगी रहा आणि जगलात तर येणारं वर्ष सुखसमृद्धीच्या आशेनं आणि दिशेनं वाटचाल करा, इतकच सध्या तरी म्हणू शकतो. नवे वर्ष निरोगीपणाचे जावो, हीच सर्वांना शुभेच्छा

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button