निर्गुण्डी – वातशामक वनस्पती !

निर्गुंडीचा पाला ग्रामीण भागात खूप परीचयाचा असतो. निर्गुंडीची झाडे बरीच बघायला मिळतात. याला उग्रगंध असतो. सिन्दुवार, शेफाली अशी नावे याला आली आहेत. याची पाने मूळे आणि बीज औषध म्हणून वापरण्यात येते.

निर्गुण्डी वाताला कमी करते त्यामुळे शिरःशूल, संधिवेदना, आमवात अशा सूज किंवा वेदना जास्त असणाऱ्या विकारांमधे निर्गुंडीची पाने गरम करून त्याचे पोल्टीस बांधल्याने वेदनाशमन होते. गर्भाशय, वृषण, गुद या अवयवावर सूज असल्यास निर्गुंडीचा काढा तयार करावा. या काढ्याने भरलेल्या टबमधे बसावे.

कंठभागी वेदना सूज असेल तर निर्गुंडीच्या काढ्याने गुळण्या कराव्या. वाळलेल्या पानांचा उपयोग शिरःशूल व सर्दीमधे धूपन स्वरूपात केला जातो. निर्गुण्डी केसांकरीता उपयोगी आहे. केस गळणे रुक्ष होणे तसेच केसांत ऊवा कोंडा होणे अशा केसांच्या तक्रारीवर निर्गुंडी तेल उपयोगी ठरते.

जखम होणे, खरचटणे व्रण होणे यावर निर्गुंडी पाने वाटून हळदीसह लेप लावावा. जखम भरून येण्यास मदत होते. सूतिका म्हणजेच बाळंतीणीच्या सर्व विकारांमधे निर्गुंडीच्या पाल्याचा उपयोग होतो. बाळंतीणीला गरम पाण्यात निर्गुण्डीची पाने टाकून स्नान केल्यास वातशमन होते. सांधे दुखत नाही तसेच वात वाढत नाही.

निर्गुण्डी तेल सर्व प्रकारच्या वातव्याधींवर मालीश करता वापरता येते. याने सूज वेदना कमी होतात. थंडीमुळे शरीर जकडणे, वातामुळे हात पायाची बोटे दुखणे अशा विकारामधे निर्गुंडीपाने टाकलेल्या पाण्याची वाफ घेतल्यास फायदा होतो.

अशी ही वातशामक वनस्पती विविध वात कफ विकारात उपयुक्त !

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER