नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा निर्णय

लंडन : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळाप्रकरणी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्सच्या कोर्टाने फरार हिरा व्यापारी नीरव मोदीच्या (Nirav Modi) भारत प्रत्यार्पणास मान्यता दिली. भारतात नीरव मोदी याच्याविरोधात खटला चालू आहे, नीरव मोदीला उत्तर द्यावे लागेल, असे लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांनी (UK court decision) सांगितले. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकावणे, असे आरोप आहेत.

मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये नीरव मोदीला आणणार
नीरव मोदी याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये योग्य वैद्यकीय उपचार आणि मानसिक आरोग्यसेवा दिली जाणार आहे. प्रत्यार्पणाच्या आदेशाला नीरवने कोर्टात आव्हान केले होते. दोन वर्षांनंतर लंडनच्या न्यायदंडाधिकारी सॅम्युएल गूजी यांनी नीरव याच्याविरुद्ध कायदेशीर खटला सुरू केला.

ज्यामध्ये त्यांना भारतीय न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला. दोन वर्षांपूर्वी नीरव मोदीला ब्रिटनच्या पोलिसांनी लंडनमधून १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. त्यानंतर दक्षिण पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात ठेवण्यात आले. आता कोर्टाचा निर्णय ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांना पाठविला जाईल, याबाबत उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी द्यायचे की नाही, यावर निर्णय घेतील.

नीरव मोदीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी ते फरार झाले. नंतर अंमलबजावणी संचलनालय (ED)कडून त्याचे बंगले, गाड्या या सर्व गोष्टींवर कारवाई करण्यात आली. ईडीने फरार नीरवकडून अनेक मालमत्ता जप्त केल्या. तर काही मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार होता. यावर नीरव मोदीचा मुलगा रोहीन मोदीने आक्षेप घेतला. रोहीन लहान असताना नीरव याने ट्रस्ट स्थापन केली. लिलाव होणारी बरीच चित्रे रोहीनच्या ट्रस्टची आहे. २००६ मध्ये ही चित्रे घेतली होती, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER