निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने रत्नागिरीतील शेतकऱ्यांच्या थकीत दूध बिलासाठी ४ कोटी ३५ लाख

kedar

रत्नागिरी /प्रतिनिधी :-  रत्नागिरी व बीड जिल्ह्यातील शासकीय दूध योजनेतील शेतकऱ्यांकडून संकलित करण्यात आलेल्या दुधाचे पैसे देण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात चार कोटी ३५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आज विधान परिषदेत दिली.

प्रकल्प हवा की नको, शिवसेनेतच दोन गट

आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, महादेव जानकर आदी सदस्यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध बिल प्रलंबित असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच या प्रश्नावर राज्य सरकारने कोणती कार्यवाही केली होती, याबाबत विचारणा केली होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चार महिन्यांपासून दूधाची रक्कम प्रलंबित होती. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी २० लाख रुपये जमा करण्यात आले होते. उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी आमदार डावखरे यांच्याकडून हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडण्यात आला होता. या प्रश्नासंदर्भात दुग्धविकास मंत्री सुनील केदार म्हणाले, “शासकीय दूध खरेदीसाठी अर्थसंकल्पात १७१ कोटी ७६ लाखांची तरतूद होती. मात्र, हा निधी अपुरा पडत असल्यामुळे हिवाळी अधिवेशनात आणखी २२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. रत्नागिरी व बीड जिल्ह्यातील शासकीय दूध योजनेसाठी हा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणखी चार कोटी ३५ लाखांची मागणी करण्यात आली आहे.” दरम्यान, आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.