फोटोसाठी निरंजनने केली मेकअप रूमची सफाई

Niranjan Kulkarni

फोटो काढायला आणि काढून घ्यायला कुणाला आवडत नाही ? जर तुम्हाला कोणी म्हटले की तुझा फोटो काढू तर आपण लगेच पोझ देऊन तयार होतो. अभिनेता निरंजन कुलकर्णी हादेखील फोटो काढून घेण्यासाठी प्रचंड क्रेझी आहे. फोटो काढून घेण्यासाठी निरंजनने आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील मेकअप रूम स्वच्छ केली. निरंजनचा हाच वेडेपणा पकडत त्याचा ऑनस्क्रीन भाऊ अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) याने फोटोच्या बहाण्याने निरंजन कडून ही साफसफाई करून घेतल्याचे उघड झाल्यानंतर मात्र दोघांचीही हसून पुरेवाट झाली.

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या निरंजन कुलकर्णी हा अभि ही भूमिका साकारत आहे. तर या मालिकेतील त्याच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता अभिषेक देशमुख काम करतोय. मालिकेत या दोघांची केमिस्ट्री जितकी मस्त जुळलेली आहे तितकीच मालिकेच्या सेटवर देखील या दोघांची सतत धमाल सुरू असते. अभिषेक देशमुखला फोटो काढण्याचा चांगला सेन्स आहे. त्यामुळे निरंजन सतत अभिषेक कडून खूप छान छान फोटो काढून घेत असतो. या दोघांची मेकअप रुम देखील एकच असल्यामुळे मेकअप रूम मध्ये त्यांच फोटोसेशन सुरू असतं . निरंजनच्या मेकअप रूम मध्ये खुप सारा पसारा झाला होता. आणि हा पसारा कसा साफ करून घ्यायचा यासाठी अभिषेकने एक शक्कल लढवली. त्याने निरंजन ला त्याचे फोटो काढूया असे म्हणत त्याच्या रूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभे रहायला सांगितले. मात्र याच दरम्यान पोझ देत असताना, अरे तो मागचा कंगवा नीट ठेव, खिडकीचा पडदा नीट कर, बेडवर पडलेली कपडे उचलून ठेव ,असं करत करत मेकअप रूम साफ करायला लावली.

फोटो काढण्याच्या आनंदाच्या नादात आणि पोझ देण्याच्या वेडेपणात निरंजनच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र जेव्हा हे सगळं फोटोसेशन संपलं तेव्हा कॅमेरात त्यांचे छान छान फोटो कैद झाले होते. पण त्याची मेकअप रूम कधी स्वच्छ केली हे त्याला कळलेच नाही. अखेर ही भांडाफोड अभिषेकने केल्यानंतर मात्र निरंजनने याची चांगलीच फिरकी घेतली.

सध्या ,आई कुठे काय करते या मालिकेत निरंजन कुलकर्णी च्या भूमिकेचे खूप छान कौतुक होतंय. या मालिकेत निरंजन साकारत असलेल्या अभी आणि अनघा यांच्यातील काही गुलाबी क्षण पडद्यावर येणार आहेत त्यामुळे सध्या या नव्या ट्रैकच्या प्रतीक्षेत निरंजन आहे. नाशिक मधून मेकॅनिकल इंजिनियर ही पदवी घेतलेल्या निरंजनला शालेय वयापासूनच अभिनयात आवड होती. नवव्या वर्षी निरंजनने सर्वात पहिल्यांदा कॅमेरासमोर अभिनय केला. त्यानंतर एकांकिका नाटक यामाध्यमातून तो सतत अभिनयाशी जोडला गेला होता. 2012साली उंच माझा झोका या मालिकेतून छोट्या पडद्यावर त्याचे पदार्पण झाले. या मालिकेत दामोदर अभ्यंकर ही भूमिका त्याने साकारली होती. तर जावई विकत घेणे आहे या मालिकेतील मुख्य भूमिकेत अभिनय करण्याची त्याला संधी मिळाली. तू माझा सांगाती या मालिकेतील ज्ञानेश्वर तर गणपती बाप्पा मोरया या मालिकेत श्रीविष्णूच्या भूमिकेतही निरंजनने त्याच्या अभिनयाची कसोटी दाखवून दिली. तू अशी जवळी रहा या मालिकेतील अभिनय देखील भाव खाऊन गेला. विशेष म्हणजे या मालिकेतही आई कुठे काय करते या मालिकेत त्याच्या वडिलांची भुमिका करणारे मिलिंद गवळी हेच त्याच्या तू अशी जवळी रहा या मालिकेतही वडिलांच्या भूमिकेत होते. त्यामुळे पाठोपाठ आलेल्या दोन्ही मालिकांमध्ये निरंजनला वडील म्हणून मिलिंद गवळी यांची साथ मिळाल्याने ते दोघेही प्रचंड खूश आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER