निलेश राणेंविरोधात प्रकाश आंबेडकरांचे खडे बोल; निलेश राणेंनी माफी मागावी – प्रकाश आंबेडकर

Nilesh Rane & Prakash Ambedkar

पुणे : गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहात नाही. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही- अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

निलेश राणेंनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला असून वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ‘हिजडा’ शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात ४९९, ५०१ अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा फैजपूर (जळगाव) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर राजकीय वाद चालू आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या.

‘कोणीतरी ‘हिजडा’ राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले, समोर आले की पिवळी होते साल्यांची, जागा सांग तनपुरे येतो मी.’ अशा पद्धतीने भाषा वापरत, तृतीयपंथी समुदाय जो की, स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे व त्याच्या संघर्षाविषयी कुठलीही जाणीव नसलेले व लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले, निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहचविणारे असल्याचे तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले आहे.

२०१४ च्या दीर्घ अहवालाअंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकार यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग, जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने त्याच्या अस्मितेला ठेच पोहचविणारा व सामाजिक क्षती पोहचविणे हा अपराधच आहे. भारतीय दंड विधान ४९९,५०१ नुसार वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य शमिभा पाटील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धिप्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला