चौकशी होत राहील, आधी मंत्र्याची हकालपट्टी करा – निलेश राणे

Nilesh Rane-CM Thackeray-Sanjay Rathore

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप (BJP) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद रंगला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane)यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्र्याला खतपाणी कशाला घालता? थेट मंत्र्याची हकालपट्टी करा आणि चौकशी होत राहील, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही मागणी केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातील ऑडिओ तर समजतो ना… आवाज समजतो ना… तुमच्या मंत्र्याचा आवाजही तुम्हाला माहीत नाही?… त्यांना बाहेर काढा… खतपाणी का घालताय?…. मंत्र्याला हाकला, घरी पाठवा, चौकशी होत राहील, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावरही सडकून टीका केली. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी कामधंदे सोडले आहेत. त्यांचा केवळ आणि केवळ गुन्ह्यांमध्ये वेळ जातोय. यापूर्वीही या नेत्यांनी असेच गुन्हे केले. एका इंजीनियरला घरी नेऊन मारहाण केली, असं सांगतानाच जो चुकला असेल तर चुकला म्हणा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच करायचे. बाळासाहेबांनी घाणेरड्या लोकांना खतपाणई घातलं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींवर आरोप झाले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना तातडीने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले आणि नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री केलं होतं, याकडेही त्यांनी ठाकरे सरकारचं लक्ष वेधलं.

मागे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या घरी इंजीनियरला जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्याविरोधात एफआयआर केला का? या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही होते. आणखी काय हवं होतं. स्वत: आव्हाडांनीही इंजीनियरला मारल्याचं सांगितलं. मग एफआयआरमध्ये आव्हाडांचं नाव का नाही? असा सवालही त्यांनी केला.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली. दुसरं लग्न झाल्याची माहिती लपवली. त्यांची आमदारकी रद्द झाली की नाही? ‘पोरं लपवा, बायका लपवा’ हे काय आम्ही सांगितलं होतं? याप्रकरणात आम्ही बदनामी केली होती? त्यांनीच त्यांची माहिती दिली. मग ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारचा दोन वर्षाचा काळ केवळ लपवालपवीत गेला आहे. दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणात 70 दिवसानंतर सीबीआयला संधी मिळाली. टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर येत आहेत. मोठ्या लोकांना हे शोभत नाही. बाळासाहेब ठाकरे करारी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे हा करारीपणा एक टक्काही दिसत नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वत:च्या लेकावर तरी कारवाई केली का? असा प्रश्न करतानाच भाजप पक्ष या प्रकरणावर एकत्र बसून निर्णय घेईल. कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER