शरद पवार वडिलांसारखे, संकटसमयी तेच आधार देतात; निलेश लंकेचे भावनिक विधान

Nilesh Lanke-sharad pawar

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची (Corona Virus) संख्या वाढत असल्याने आपल्या मतदारसंघातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाळवणी येथे तब्बल अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. त्यातील शंभर बेडला ऑक्सिजनची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, निलेश लंके यांनी या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर असं नाव दिलं. या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर हे नाव का दिलं, अशी विचारणा लंके यांना केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं नाव देण्यामागील भावना आणि प्रेरणा बोलून दाखवली. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा शरद पवारच धावून गेले. १९९३ साली किल्लारीला भूकंप झाला, तेव्हा धावून गेले. दोन वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूरला महापूर आला, तेव्हाही हा ८० वर्षांचा योद्धाच धावून गेला. म्हणजे, ज्यावेळेस संकट आलं तेव्हा शरद पवारच (Sharad Pawar) धावून गेले आहेत. आपल्याला काटा टोचला तर आपण आई म्हणून हाक मारतो. आणि जर एखादा नाग दिसला तर आपण बाप रे म्हणतो.

शरद पवार हे आपल्यासाठी वडिलांच्या जागी आहेत, महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा ते धावून जातात. सगळ्यांना आधार देतात. म्हणूनच मी या कोविड सेंटरला शरद पवार यांचं नाव दिलं. हे कोविड सेंटर नसून आरोग्य मंदिर आहे. मंदिरात गेल्यावर प्रत्येकाला समाधान वाटतं, तसंच या कोविड सेंटर किंवा आरोग्य मंदिरात आल्यानंतर प्रत्येक रुग्णाला समाधान वाटलं पाहिजे, ते कोरोनाला विसरुन गेले पाहिजेत, अशी संकल्पना असल्याचंही लंके यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button