निकिता जेकब, दिशा रवी, शांतनु यांनी ‘टूलकिट’ तयार केले, त्यांना …

दिल्ली : दिशा रवी, निकिता जेकब व शांतनु यांनी टूलकिट तयार केले आणि एडिट करण्यासाठी ते इतरांना शेअर केले, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. ‘टूलकिट’ प्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या दिशा रवी (२१) च्या अटकेनंतर, सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट निघाले आहे. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनी ‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करण्याचा आरोपींचा उद्देश होता. याप्रकरणी निकिता जेकब व शांतनु विरोधात अजामानिपत्र वॉरंट निघाले आहे.

दिल्ली पोलिसांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, टूलकिट प्रकरणात ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चा देखील सहभाग आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी जानेवारीत टूलकिट बनवण्यात आले. आंदोलन परदेशात पोहचवण्याची व परदेशातील भारतीय दूतावासांना लक्ष्य करण्याची योजना होती.

एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांच्या मते ११ जानेवारी रोजी ‘झूम मिटींग’ करण्यात आली होती. या मिटिंगमध्ये निकिता, शांतनु आणि दिशा सहभागी झाले होते. मिटिंगमध्ये ठरवण्यात आले की २६ जानेवारी रोजी ‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करायचे. या झूम मिटिंगमध्ये जवळपास ६० ते ७० जणांनी भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER