कारभारीनंतर आता निखिल होणार डार्लिंग

Nikhil Chavan

राजकारण आणि प्रेम या विषयावर कितीही सिनेमा, नाटक, मालिका आल्या असल्या तरी हा विषय काही जुना होत नसतो. हेच दाखवणारी कारभारी ही मालिका सुरू झाली आहे. लागिरं झालं जी या मालिकेत हिरोचा मित्र असलेल्या निखिल चव्हाण याने एक स्टेप पुढे येत कारभारी मालिकेत नायकाची भूमिका साकारली आहे. निखिलचे ग्रह यंदा चांगलेच फॉर्मात आहेत कारण कारभारी 0100 पसंतीस उतरत असतानाच निखिलला नव्या सिनेमाची ऑफरही आली आहे. या सिनेमात तो कुणाचातरी डार्लिंग होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिनेमाची रिलीज होण्याची तारीख ठरल्याने निखिलच्या फॅनक्लबमध्ये वाढ होणार हे नक्की.

फौजींच्या आयुष्यावर बेतलेल्या आणि गावाकडचा रांगडी टच असलेल्या लागिरं झालं जी या मालिकेत फौजी विक्या घराघरात पोहोचवण्यात निखिलच्या अभिनयाने बाजी मारली होती. याच मालिकेतील जयडीचा रोल करणाऱ्या पूर्वा शिंदे हिच्यासोबतचे फोटोही तो शेअर करत असतो. निखिल आणि पूर्वा रिलेशनशीपमध्ये असल्याचंही बोललं जात आहे, पण अजून तरी या दोघांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही. लागिरं ही मालिका संपल्यानंतर विकीची भूमिका करणाऱ्या निखिलने काही सिनेमातही काम केलं. जाहिराती, वेबसिरीजमध्येही तो झळकला. पण काही दिवसांपूर्वीच टीव्हीवर आलेल्या कारभारी, लय भारी या मालिकेत निखिल खास लूकमध्ये चाहत्यांसमोर आला. मानेवर झुलणारे कुरळे केस, राजकारणामुळे वागण्यातील बिनधास्तपणा त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडला. ही मालिका सुरू होऊन महिना होण्यापूर्वीच निखिलने त्याच्या इन्स्टा पेजवर नव्या सिनेमाची हटके बातमी चाहत्यांना दिली आहे. तुमच्या वहिनीसाठी आणली आहे मी रिंग, ती माझी राणी आणि मी तिचा ओन्ली किंग अशी कॅप्शन देत निखिलने त्याच्या डार्लिंग या नव्या सिनेमाची खास बातमी शेअर केली आहे. नावावरूनच हा सिनेमा लव्हस्टोरी असणार हे तर चाहत्यांना पक्कं कळलं आहे. जेव्हापासून निखिलने त्याच्या या डार्लिंग सिनेमाविषयी सांगितले आहे तेव्हापासून त्याला मेसेज करून आणि त्याच्या सोशल मीडिया पेजवर कमेंटबॉक्समध्ये मेसेज करून अभिनंदन केले जात आहे. आता निखिलच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती निखिलची ऑनस्क्रिन डार्लिंग असणार तरी कोण. या सिनेमात टाइमपास फेम दगडू म्हणजे प्रथमेश परबदेखील आहे. प्रथमेशचाही चाहतावर्ग मोठा आहे. डार्लिंग सिनेमाची नायिका रितिका श्रोत्री असल्याचीही त्याने हिंट दिली आहे. बॉइज या सिनेमात रितीकाचा अभिनय आपण पाहिला आहे. मराठी सिनेमातील फ्रेश चेहरा म्हणून रितीका सध्या फॉर्मात आहे. आता निखिल, प्रथमेश आणि रितीका यांच्या प्रेमाचा त्रिकोण असेल का हा सिनेमा अशीही उत्सुकता आहे. निखिल या नव्या सिनेमासाठी खूपच खुश आहे.

मूळचा पुण्याचा असलेल्या निखिलने वीरगती या सिनेमातही काम केलं होतं. थ्री चिअर्स हे त्याचे नाटकही लोकप्रिय आहे. स्त्री लिंग पुल्लिंग या वेबसिरीजमधील निखिलची भूमिकाही गाजली होती. पण खऱ्या अर्थाने तो लोकप्रिय झाला लागिरं झालं जी या मालिकेने. आता कारभारी या मालिकेतील त्याचा अभिनय आणि लूकही प्रेक्षकांना खूप आवडत असल्याच्या प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत येत आहेत.

लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी लागिरं ही मालिका संपली होती. हातात फार काम नव्हतं. आता कारभारी या मालिकेमुळे नवा हुरूप आला आहे असं निखिल सांगतो. शाळा, कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेत सहज म्हणून सहभागी झालेल्या निखिलला पुढे करिअरसाठी हेच क्षेत्र खुणावू लागलं. या क्षेत्रातील मेहनतीला तो खूप जास्त मान देतो. निखिल सांगतो, सेलिब्रिटीभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय प्रत्येकाला दिसतं पण ते काय मेहनत घेत असतात याची खूप कमी जणांना माहिती आहे. म्हणून मला माझ्या क्षेत्रातील प्रत्येक लहानमोठ्या कलाकाराचा अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त फटका मनोरंजन क्षेत्राला बसला. अजूनही धास्तावलेल्या वातावरणातच सगळं सुरू आहे. त्यामुळे नव्या मालिका सुरू होत आहेत, नवे प्रोजेक्ट सुरू होत आहेत ही वरवर पाहता जरी एक साधी गोष्ट दिसत असली तरी यामुळे कित्येक कुटुंब मानसिक, आर्थिक ओझ्यातून मुक्त होणार आहेत. नवी आशा…नवी सुरूवात अशा ओळी लिहून निखिलने त्याच्या नव्या सिनेमाची बातमी शेअर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER