निखिल होणार कारभारी

राजकारणात फुलणाऱ्या प्रेमाच्या गोष्टी आजवर अनेकदा सिनेमा किंवा मालिकेची कथा बनल्या आहेत. अशाच एका मालिकेचे रणशिंग फुंकले जाणार हे गेल्या काही दिवसांत प्रोमोमधून दिसत होते. प्रोमो म्हटलं की, उत्सुकता ताणवायची हे समीकरण आलंच. हजारो लोकांसमोर, ‘आम्हीच इथले कारभारी’ असा संवाद म्हणणारा कुरळ्या केसांचा पाठमोरा नायक फक्त दिसत होता.

Nikhil Chavan ‘कारभारी’ (Karbhari) म्हणून टीव्हीवर कोण दिसणार या प्रश्नावरचा पडदा बाजूला सारत नव्या प्रोमोमध्ये हेलिकॉप्टरमधून नायिकेच्या भेटीला येणारा कारभारी दिसला आणि हा तर आपला विक्या अशी आपुलकीची प्रतिक्रिया चाहत्यांमधून आली. हो, ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला फौजी विक्रम म्हणजे विक्याची भूमिका साकारणारा निखिल चव्हाण (Nikhil Chavan) कारभारी होणार आहे हे आता सगळ्यांनाच कळलं आहे. राजकारणाची झिंग आणि त्यात प्रेमासारखं नाजूक नातं फुलणार हे तर माहीत आहे. त्यामुळे प्रोमोपासूनच या मालिकेबाबत वेगळी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुण्याचा असलेला निखिलचा सुरुवातीपासूनच अभिनयाकडे कल होता. मात्र त्याचा प्रवासही सोपा नव्हता. पण त्याने खूप संघर्ष केला. बारावीमध्ये नापास झाला तेव्हा त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नापास झाल्यानंतर रिकामा असताना त्याने एका एकांकिकेत काम केले आणि त्यानंतर त्याला कामातून काम मिळायला लागले. पण मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले नव्हते.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात तो बॅकस्टेजला लाइट लावण्याचे काम करायचा. त्यातूनच पुढे त्याला छोटी छोटी कामं मिळायला लागली. हातात काम नसलं तरी इच्छा प्रबळ होती. प्रॉडक्शनमध्येच काम करणं सुरू असताना त्याची ओळख तेजपाल वाघ याच्याशी झाली आणि तो ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत दिसला. यापूर्वी त्याने स्त्रीलिंग, पुल्लिंग ही वेबसिरीजही केली आहे. खरं तर ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत तो नायक नव्हता तर नायक अजिंक्यचा मित्र होता. पण त्याने अभिनयातून प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच वेधले होते. याच मालिकेत जयडीच्या भूमिकेत असलेल्या पूर्वा शिंदे हिच्यासोबत मैत्री वाढल्याने निखिल आणि पूर्वा यांच्या रिलेशनशिपची चर्चाही रंगली होती.

निखिल आणि पूर्वा यांचे फोटोही त्यांच्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या रिलेशनशिपमध्ये किती खरं आहे ते निखिल आणि पूर्वालाच माहीत; पण चाहत्यांना ही जोडी आवडत असल्याच्या प्रतिक्रिया कमेंटमधून आल्या आहेत. अभिनय आणि निवेदन यामध्ये निखिलला खूप रस आहे. कारभारी या मालिकेत एक तगडा, डॅशिंग नायक हवा होता, निखिल या भूमिकेसाठी निवडला गेला. या मालिकेत त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. राजकारणातील खुन्नस तर या मालिकेत पाहायला मिळणार आहेच; पण एक धडाकेबाज राजकारणी नेता साकारण्याची संधी या भूमिकेने निखिलला दिली आहे.

या भूमिकेसाठी आजवरच्या अनेक राजकारणावर आधारीत सिनेमांचा अभ्यास केल्याचे निखिल सांगतो. ही भूमिका म्हणजे आव्हान होते; कारण सध्या राजकारण अनेक अर्थाने चर्चेत आहे. एखाद्या राज्यातील प्रादेशिक नागरिक आणि परप्रांतीय नागरिक यांच्यातील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा मुद्दाही या मालिकेत दिसणार आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या युवकांना त्यांचे खाजगी आयुष्यही असते आणि त्यामध्ये त्यांच्या आयुष्याची जोडीदार यांना वेळ देण्यासाठी खूप काही करावे लागते. अशा अनेक गोष्टी या मालिकेत पाहायला मिळणार असल्याने निखिलच्या कारभारी भूमिकेला अनेक पैलू आहेत. या भूमिकेसाठी निखिलच्या ड्रेसिंगपासून हेअरस्टाइलपर्यंत अनेक वेगळे प्रयोग केले आहेत.

याआधी पडद्यावर दिलेल्या निखिलपेक्षा ऑनस्क्रीन कारभारीचा लूकही सध्या चर्चेचा विषय आहे. या मालिकेत अनुष्का सरवटे ही त्याच्या नायिकेच्या भूमिकेत असून यापूर्वी तिने ‘लक्ष्मीनारायण’ या मालिकेत काम केले आहे. फौजी म्हणून लोकप्रिय झालेला निखिल आता राजकारणातील कारभारी म्हणून चाहत्यांच्या पसंतीची किती मतं मिळवतो हे मालिका सुरू झाल्यानंतरच दिसेल. तोपर्यंत कारभारीच्या येण्याची प्रतीक्षा चाहत्यांना आहेच.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER