विश्वविजेत्यांना नमवल्यावर निखतची नजर आता राष्ट्रकूल व आशियाईच्या यशावर

Nikhat Zareen

निखत झरीन (Nikhat Zareen) ..हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटत असेल तर ही तीच खेळाडू आहे जिने गेल्या वर्षी मेरीकोमच्या थेट निवडीला आव्हान दिले होते आणि आपल्यावर अन्याय झाल्याची, आपल्याला डावलले गेल्याची तक्रार केली होती. आपल्याला निवड चाचणीसुध्दा खेळू न दिल्याचा गंभीर आरोप तिने केला होता आणि मेरी कोमशी मला लढू तर द्या..त्यानंतर ठरवा मी निवडीला पात्र आहे की नाही असे आव्हानही तिने दिले होते. तर अशी ही निखत झरीन आता पुन्हा चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण म्हणजे तुर्किमधील बोस्फोरस बाॕक्सिंग (Boxing) स्पर्धेतील तिची चमकदार कामगिरी.

या स्पर्धेत तिने एक नाही तर दोन-दोन विश्वविजेत्यांना मात दिली आणि कास्यपदक जिंकले. रशियाची पाल्टसेवा एकाटेरिना आणि कझाकस्तानची नाझीम किझायबे या दोन विश्वविजेतींना ती भारी पडली मात्र त्यानंतर तुर्कीच्या बुसेनाज काकीरोग्लुकडून ती पराभूत झाली. मात्र या यशासह तिने साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतले आहे. तिचे लक्ष्य आता 2022 चे राष्ट्रकूल सामने व आशियाड आहे.

निखत ही ज्युनियर गटाची माजी विश्वविजेती आहे. आशियाई स्पर्धेचेही कास्यपदक तिच्या नावावर आहे. आणि आता तिची ही कामगिरी तिला राष्ट्रकूल व आशियाडमध्ये यशाचा विश्वास देणारी आहे.

ती म्हणते की 8 जानेवारीलाच राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते आणि त्यानंतर दोनच महिन्यात विश्वविजेत्यांना नमवण्यासारखी कामगिरी मी करू शकले यामुळे माझा विश्वास कितीतरी वाढला आहे.आता मी पूढील वर्षीच्या महत्त्वाच्या स्पर्धांकडे लक्ष देणार आहे. वर्षभरातील तिची ही पहिलीच स्पर्धा होती.गेल्या जानेवारीत ती स्ट्रँन्या स्मृती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यानंतर लाॕकडाऊन आणि इतर वादाविवाद, आरौप प्रत्यारोपात ती अडकली पण त्यावर मात करत वर्षभरानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत तिने ही चमकदार कामगिरी केली आहे.

ही 24 वर्षीय खेळाडू 51 किलोगटाच्या लढतींचा कार्यक्रम पाहिला तेंव्हा चक्रावलीच होती. काय करावे हेच तिला सुचेना एवढे बलाढ्य प्रतिस्पर्धी तिच्या मार्गात आले होते पण ती शांत राहिली आणि ही एक नवी सुरुवात आहे.इथे चांगली कामगिरी केली तर आपला सर्वांवरच निश्चितपणे चांगला प्रभाव पडेल या विचाराने ती खेळली आणि तिने आपला प्रभाव पाडला.

पहिली लढत अडखळत झाली पण नंतर लय पकडली. विश्वासही वाढला. ह्या अनुभवाचा भविष्यात आपल्याला फायदाच होईल असे तिने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER