गुजरात, मध्यप्रदेशनंतर राजस्थानमध्येही नाईट कर्फ्यू

- मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड

Night Curfew

देशभरात पुन्हा कोरोनाची साथ वाढताना दिसते आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशानंतर आता राजस्थान सरकारनेही खबरदारी म्हणून आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रकम वाढवून ५०० रुपये केली आहे. राजधानी जयपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग सर्वांत जास्त असलेल्या आठ जिल्ह्यांच्या (जयपूर, जोधपूर, कोटा, बीटेकर, उदयपूर, अजमेर, अलवर आणि भीलवाडा) शहरी भागात बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि अन्य व्यावसायिक संस्था ७ वाजेपर्यंतच सुरू राहतील. शहरी भागात रात्री ८ ते सकाळी ६ कर्फ्यू राहील. राज्यात विवाह सोहळ्यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमांमध्ये सामील होणाऱ्या लोकांची संख्या १०० करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील पाच जिल्ह्यांत कर्फ्यू

यापूर्वी मध्यप्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भोपाळ, इंदौर, विदिशा, रतलाम आणि ग्वाल्हेर या पाच जिल्ह्यांत शनिवारीपासून रात्री १० ते सकाळी ६ कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.

गुजरात सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू अहमदाबाद शहरात शुक्रवार (२० नोव्हेंबर) रात्री ९ ते सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत आहे. गुजरात सरकारने नव्याने लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER