सचिन वाझे प्रकरण ; ठाकरे सरकार सावध; वर्षा बंगल्यावर शरद पवार-मुख्यमंत्र्यांची भेट

nia-investigation-sachin-vaze-sharad-pawar meets cn thackeray

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार (Thackeray Govt) सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा सुरु होती. या भेटीत सचिन वाझे आणि एनआयएचा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आता दुपारी चार वाजता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे कारण मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा असे सांगितले असले तरी या बैठकीत सचिन वाझे प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते.

तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये बदल करायचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे पंख छाटले जाणार आणि कुणाची वर्णी लागणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER