एल्गारचा तपास एनआयएकडे देणे संशयास्पद; बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई :- दोन वर्षांपूर्वी पुण्यात एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे उसळलेली दंगल या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संंबंध जोडण्यात येत असला तरी ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करतात. तसेच, एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडे गेल्यानंतर कॉंग्रेसचे नेते, महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धक्कादायक विधान करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एनआयएकडे  तपास सोपवण्याचा निर्णय आताच का घेतला गेला, आताची वेळ आणि परिस्थिती पाहता संशयाला वाव आहे, असं थोरात म्हणाले आहेत.

तसेच पुरोगाम्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न पडतो. म्हणूनच  एनआयएकडे  तपास दिल्याने काळजी वाटते, असं थोरात म्हणाले.

एकीकडे थोरात यांनी  एनआयएविरोधात स्पष्ट भूमिका घेतली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेसुद्धा भिडे-एकबोटेंमुळेच भीमा कोरेगावची घटना घडल्याचा  वारंवार पुनरुच्चार करत आहेत.

भीमा कोरेगावच्या प्रकरणावर एल्गार परिषदेची भूमिका काय होती याविषयी तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. एल्गार परिषदेशी संबंधित काही व्यक्तींची चौकशीही झाली आणि आता  एनआयए ती नव्याने करू शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  एनआयएकडे  तपास देणं संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. हा निर्णय काळजी वाढवणारा आहे, असंही ते म्हणाले. “एल्गार हे पुरोगामी व्यासपीठ होतं. या व्यासपीठावर सगळे कवी आणि विचारवंत होते. त्यांच्याविरोधात काही पुरावा असेल तर आम्ही बाजू घेणार नाही. पण त्यांची अशी चौकशी करणं म्हणजे विचारवंतांचा विचार दाबण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न पडतो आहे. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे अशा विचारवंतांची हत्या झाली. आता आंबेडकरवादी विचारवंतांना नक्षलवादी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं. म्हणून काळजी वाटते. ” असं थोरात म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र, सगळा देश याकडे संशयाच्या नजेरेने पाहतो आहे, असंही थोरात म्हणाले.

भिडे, एकबोटे यांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे भीमा-कोरेगाव हिंसाचार; पवारांचा आरोप