येत्या दोन-तीन दिवसांत राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार; मनसेचा दावा

Avinash Jadhav Maharashtra Today

वसई :- देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात आता मनसेने (MNS) उडी घेतली आहे. अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी एका बड्या मंत्र्याने सुपारी घेऊन रचलेला हा कट आहे, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी वसईत केला.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आलं आहे. सध्या या प्रकरणाचा एनआयए योग्य दिशेनं तपास करत आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांत मोठी पत्रकार परिषद होणार असून यात राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांची राष्ट्रीय राजकारणात मोठी खेळी, काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी होण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER