माझ्या राजीनाम्याच्या बातम्या निराधार – अनिल देशमुख

Maharashtra Today

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्या असलेली कार सापडण्याच्या प्रकरणातील एका चौकशी अधिकाऱ्यालाच संशयित म्हणून अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचाही राजीनामा होणार अशी चर्चा सुरू झाली होती पण, ती चर्चा निराधार आहे, (News of my resignation is baseless ) असा खुलासा स्वतः देशमुख यांनी केला.

या प्रकरणात स्फोटके असलेल्या कारचा कथित मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक झाली. पोलीस आणि सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. सचिन वाझेचा सरळ शिवसनेशी संबंध असल्याने आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्याच्या बचावात उतरल्याने प्रकरण मुख्यतः शिवसेनेवर शेकत असले तरी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकरमध्ये गृहखाते राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्याकडे असल्याने राष्ट्रवादीचीही शोभा झाली.

सरकारच्या या झालेल्या धुलाईसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. पवार गृहमंत्र्यांचा कामावर णर्ज असल्याची चर्चा सुरु झाली. काल गृहमंत्री अनिल देशमुख पवारांच्या भेटीसाठी तातडीने दिल्लीला गेलेत. त्यामुळे देशमुख यांचे गृहखाते बदलले जाणार या चर्चेला जोर आला पण, देशमुख यांनी ट्विट करून याचे खंडन केले.

अनिल देशमुखांचे ट्विट – आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात मा.पवार साहेबांची भेट घेतली व मागील २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी #ATS व #NIA ने केलेल्या तपासाची चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या, त्यात कोणतेही तथ्य नाही.

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांनी हाताळलं आहे, त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER