बेलगाम वृत्तवाहिन्याच झाल्या ‘हिट व्हिकेट’ !

Ajit Gogateबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येसंबंधीच्या बातम्या व चर्चात्मक कार्यक्रम निष्कारण खळबळ माजेल अशा भडक व संवेदनशून्य पद्धतीने प्रसारित केल्याबद्दल ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डडर्स अ‍ॅथॉरिटी’ने (NBSA) हिंदी व इंग्रजीतील ‘आज तक’, ‘झी न्यूज’ आणि ‘ न्यूज २४’ व मराठीतील ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिन्यांचे कान उपटले हे फार उत्तम झाले. अ‍ॅथॉरिटीने या वृत्तवाहिन्यांची निर्भत्सना करून त्यांना त्यांच्याच माध्यमातून जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला तर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मी ‘हे फार उत्तम झाले’, असे वर म्हटले त्याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, या बेलगाम झालेल्या वृत्तवाहिन्यांना कोणीतरी टपली मारून भानावर आणणे गरजेचे होते. हे काम त्यांच्याच भाऊबंदांनी केले म्हणून ‘उत्तम’.  ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डडर्स अ‍ॅथॉरिटी’ ही भारतातील वृत्तवाहिन्यांनी स्वनियंत्रणासाठी स्व:तच स्थापन केलेली नियामक संस्था आहे. या वहिन्यांची जी संघटना आहे तिने सर्व वाहिन्यांसाठी व्यावसायिक आचारसंहिता तयार केली आहे. वाहिन्या या आचारसंहितेच्या चौकटीत राहतात की नाही हे पाहणे, उल्लंघन होत असले तर संबंधित वाहिनीला चूक सुधारायला सांगून योग्य वाटेवर आणणे, तसेच प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे हे या अ‍ॅथॉरिटीचे काम आहे. इतर कोणी नाही तर स्वत:च स्वत:च स्वत:साठी ठरवून घेतलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका या वाहिन्यांवर ठेवण्यात आला आहे. म्हणजे हा ठपका केवळ घडलेल्या प्रमादाबद्दलच नव्हे तर एकप्रकारे अप्रामाणिकपणाबद्दलही आहे. जेव्हा एखादी वाहिनी जनांचीच नव्हे तर मनाचीही लाज सोडून बेलगामपणे वागू लागते तेव्हा ती संपूर्ण माध्यमविश्वाला बदनाम करत असते.

‘उत्तम’ म्हणण्याचे दुसरे कारण असे की, वाहिन्यांवरील ही कारवाई त्यांच्याच सुजाण आणि जागरूक दर्शकांनी केलेल्या तक्रारींवरून केली गेली आहे. त्यामुळे हा एक प्रकारे दर्शकांच्या हक्कांचाही मोठा विजय आहे. चुकीच्या किंवा विपर्यस्त बातमीने दुखावलेल्या वाचकाने छापील वृत्तपत्रास खुलासा किंवा प्रसंगी दिलगिरीही छापायला लावण्याच्या घटना अनेक वेळा पाहायला मिळतात. पण तेथे ती व्यक्ती स्वत: दुखावलेली असते. आताच्या या वाहिन्यांच्या प्रकरणात तसे नाही. वाहिन्यांनी सुशांतसिंगची मरणोत्तर बदनामी व अप्रतिष्ठा केली होती. याविरुद्ध सुशांतसिंगच्या कुटुंबियांनी तक्रार केली नाही. तक्रार त्रयस्थ दर्शकांनी केली. तीही सुशांतचे चाहते म्हणून आाम्ही दुखावले गेलो, अशी नाही. तर मुळात वाहिन्यांनी जे केले ते त्यांच्या व्यावसायिक नीतीमत्तेला व माणूसकीला सोडून आहे. तसेच असे कोणाच्याही बाबतीत करणे चूक आहे, या मुद्दयावर.

मालिका उद्दाम सवंगपणा करतात तो ‘टीआरपी’च्या मागे लागून. ‘टीआरपी’ म्हणजे एखादा चॅनेल किती लोक, किती वेळ पाहतात याची सर्वेक्षणातून काढलेली आकडेवारी. वाहिन्यांना मिळणाºया जाहिरातींचे प्रमाण आणि त्यांचे दर या ‘टीआरपी’वर ठरत असतात. नाव जरी वृत्तवाहिनी असे असले तरी त्यांचा मुख्य उद्देश पैसा कमावणे हाच असतो. त्यामुळे पैशासाठीच्या या गळाघोटू स्पर्धेत संपादक मंडळींना व्यावसायिक नीतीमत्ता सोडण्यास ‘मार्केटिंग’वाले भाग पाडतात. यात मानी,प्रामाणिक पत्रकार व संपादक हतबल होतात. कारण मालकांना माणूस नव्हे तर पैसा प्रिय असतो व सांगू तसे काम करणारे त्यांना बाजारात इतर खूप मिळतात. पण ही पवित्र गायीहूनही पवित्र मानली जाणारी ‘टीआरपी’ जो ठरवितो तो दर्शकच अशी नाराजी व्यक्त करू लागला तर त्याची दखल वाहिन्यांनी घेणे अपरिहार्य आहे.

या वाहिन्यांनी सुशांत आत्महत्येवरील हे कार्यक्रम सादर करताना, त्यांच्या मते ज्या ‘क्रिएटिव’ टॅग लाईन वापरल्या त्यांनीच त्यांना खड्ड्यात घातले. कारण या टॅग लाइन न वापरता कार्यक्रम दाखविले असते तर कदाचित आचारसंहितेचा भंग झाला नसता, असे अ‍ॅथॉरिटीने म्हटले. यापैकी काही   हिंदी टॅग लाईन अशा होत्या: ऐसे कैसे हिट व्हिकेट हो गये सुशांत?’, ‘सुशांत जिंदगी के पिच पर हिट व्हिकेट कैस हो गये?’, ‘सुशात इतने अशांत कैसे?’, ‘पटना का सुशांत बम्बई मे फेल क्यूं?‘, इंग्रजी वाहिन्यांच्या टॅग लाईन्सचा मतितार्थ असा होता: सुशांत तू स्वत:चाच चित्रपट का पाहत नाहीस? आणि ‘ तू चित्रपटातील भुमिकेस ज्यावर ठाम राहिलास, नेमके तेच खर्‍या आयुष्यात विसरलास’! यांचा संदर्भ सुशांतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाच्या कथानकाशी होता. मानसिक असंतुलन हा त्या चित्रपटाचा विषय होता.

वाहिन्यांच्या अँकरनी, या टॅग लाइनमधून  अतिउत्साहाच्या भरात, उत्तर द्यायला हयात नसलेल्या सुशांतला टिपेच्या स्वरात विचारले खरे, पण त्यामुळे खरे तर या वाहिन्याच ‘हिट व्हिकेट’ आणि ‘फेल’ झाल्या !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER