न्यूझीलंडने 10 षटकांतच तडकावल्या 141 धावा, केला सर्वाधिक धावगतीचा विक्रम

New Zealand Records Fastest Runrate

न्यूझीलंड (New Zealand) आणि बांगलादेश (Bangladesh) दरम्यानचा आॕकलंड (Auckland) येथील गुरुवारचा सामना होता तर टी-20 (T20I) चा पण झाला प्रत्यक्षात 10 षटकांचा…कारण पाऊस! मात्र फक्त 10-10 षटकांचा खेळ होऊनसुध्दा या सामन्यात धावा बरसल्या आणि बरेच विक्रमसुध्दा झाले. न्यूझीलंडने 10 षटकांतच 4 बाद 141 अशी मोठी धावसंख्या उभारली आणि त्याच्या पाठलागात बांगलादेशचा डाव 9.3 षटकांत 76 धावांतच आटोपला आणि न्यूझीलंडने 65 धावांनी विजय मिळवला. कोणताही टी-20 सामना जो प्रत्यक्षात 10 पेक्षा कमी षटकांच्या डावाचा झाला त्यातील हा सर्वात मोठा विजय ठरला.

विशेष म्हणजे या सामन्यात बांगलादेशी संघ पूर्ण 10 षटकेसुध्दा खेळून काढू शकला नाही तर न्यूझीलंडची 4 बाद 141 ही धावसंख्या ही आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सर्वाधिक धावगती राखलेला (14.10 धावा प्रती षटक) सामना ठरला.

टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावगतीचे पहिले डाव

धावगती —– सामना —– वर्ष
14.10 – न्यूझीलंड वि. बांगलादेश – 2021
13.90 – अफगणिस्तान वि. आयर्लंड – 2019
13.90 – झेक गणराज्य वि. तुर्की – 2019
13.27 – न्यूझीलंड वि. इंग्लंड – 2019
13.15 – आॕस्ट्रेलिया वि. श्रीलंका – 2016

या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॕलन याने अवघ्या 29 चेंडूतच 10 चौकार व 3 षटकारांसह 71 धावांची झंझावाती खेळी केली. या दरम्यान त्याने 18 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. हे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील नियमीत संघाच्या खेळाडूंतर्फे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले.

ही जलद अर्धशतके अशी…

12 चेंडू- युवराजसिंग वि. इंग्लंड, 2007
16 चेंडू- शाई होप वि.बांगलादेश, 2018
18 चेंडू- ग्लेन मॕक्सवेल वि. पाकिस्तान, 2014
18 चेंडू- फिन अॕलन वि. बांगलादेश, 2021

फिन अॕलन याने यंदाच्या मोसमात टी-20 सामन्यांत 20 पेक्षा कमी चेंडूत गाठलेले हे चौथे अर्धशतक ठरले. यासह एका मोसमात सर्वाधिक जलद अर्धशतकं करण्याचा विक्रम त्याच्या नावावर लागला आहे. या चारपैकी तीन अर्धशतके त्याने वेलिंग्टनसाठी केलीत तर चौथे न्यूझीलंडसाठी आहे.

एका मोसमात 20 पेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज…

4- फिन अॕलन – 2020-21
3- डेव्हिड वाॕर्नर – 2009-10
3- जेसन राॕय – 2014
3- ल्युक रोंची – 2017

या पराभवासह बांगलादेशच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम लागला आहे. तो असा की, बांगलादेशचा संघ आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये 9 कसोटी, 16 वन डे आणि 7 टी-20 सामने खेळला आहे आणि यापैकी एकही सामना ते जिंकू शकलेले नाहीत. एखाद्या संघाने एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या देशात सर्वाधीक सलग आंतरराष्ट्रीय सामने गमावण्याचा हा विक्रम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button