
मुंबई : तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन करण्याचा बेत आखत असाल किंवा त्याची तयारी पूर्ण केली असेल तर थोडं सबूर धरा. कारण गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हवर पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच रात्री ११ नंतर हॉटेल, पब, बार बंद राहणार असून राज्यात सर्वांना संचारबंदीच्या नियमांचं पालनही करावं लागणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाचं संकट अजूनही उभं आहे. हे लक्षात ठेवून नवीन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणानं आणि शांततेत साजरं करावं. ११ वाजता हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहतील, असं सांगत देशमुख यांनी कोरोना नियमांकडे बोट दाखवलं.
रात्री ११ नातेवाइकांकडे जाऊ शकता, पण…
रात्री ११ नंतर हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही, असं नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाइकांकडे जायचं असेल तर रात्री ११ नंतर जाऊ शकता. फक्त सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं व्यवस्थित पालन करावं. हिल स्टेशनला गर्दी होतेय, ही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
गेट वे, मरीन ड्राईव्हवर मज्जाव
मुंबईत दरवर्षी थर्टीफर्स्टला ज्या ठिकाणी गर्दी होते, त्याबाबत सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यासारख्या ठिकाणीही पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला