नवीन वर्षात बॉलिवुड लागले जोमाने कामाला, तीन नव्या सिनेमांची झाली घोषणा

Bollywood

2020 ची सुरुवात धमाक्यात झाली होती. 10 जानेवारीला अजय देवगण (Ajay Devgan) अभिनीत आणि ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शत ‘तान्हाजी द अनंसग वॉरियर’ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. छोट्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यानंतर ‘छपाक’, ‘जवानी जानेमन’, रजनीकांतचा ‘दरबार’ या सिनेमांसह अनेक सिनेमे रिलीज झाले होते. पण मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली आणि सगळेच ठप्प पडले ते थेट डिसेंबरपर्यंत. मात्र नव्या नव्या वर्षात बॉलिवुड पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेले दिसत आहे. अर्धा डझनपेक्षा जास्त मोठ्या सिनेमांचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे तर याच काळात तीन नव्या मोठ्या सिनेमांची घोषणाही करण्यात आली. यावरून बॉलिवुडने मागील वर्षातील कटू आठवणी मागे टाकून पुन्हा एकदा उत्साहात काम सुरु केल्याचे दिसू लागले आहे.

सरकारने शूटिंगसाठी परवानगी देताच अक्षयकुमारने परदेशात जाऊन त्याच्या बेलबॉटमचे शूटिंग पूर्ण केले. सलमान खानने त्याच्या राधे- द मोस्ट वाँटेड भाईचेही शूटिंग पूर्ण केले. आणि सध्या तो आयुष शर्मासोबतच्या आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या काही कलाकारांच्या सिनेमाच्या शूटिंगचे दुसरे शेड्यूल भारताच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. 7 जानेवरीला अक्षय कुमारने राजस्थानच्या जैसलमेरमध्ये निर्माता साजिद नाडियाडवालाचा आणि फरहाद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ चे शूटिंग सुरु केले. साजिद नाडियाडवाला आणि अक्षयकुमारचा हा एकत्र दहावा सिनेमा आहे. सैफ़ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरही जैसलमेर असून तेथे ते ‘भूत पोलीस’ सिनेमाच्या शूटिंगच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये व्यस्त आहेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर सध्या उत्तराखंडमधील डेहराडून येथे असून तेथे ‘बधाई दो’ या त्यांच्या नव्या सिनेमाचे शूटिंग करीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करीत आहे. हर्षवर्धनने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंटर’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

कोरोनानंतर तामिळनाडूमध्ये कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावरील ‘थलाइवी’ चे शूटिंग पूर्ण केले. आणि आता ती तिचा आगामी अॅक्शनपॅक्ड सिनेमा ‘धाकड़’ च्या शूटिंगमध्ये बिझी झाली आहे. 8 जानेवारीपासून मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असून पचमढ़ी आणि सारणीमध्ये दोन महिने हे शूटिंग चालणार आहे. रजनीश घई दिग्दर्शित या सिनेमात अर्जुन रामपालही महत्वाची भूमिका साकारत आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर लव रंजन दिग्दर्शित सिनेमाच्या शूटिंगसाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. रणबीर आणि श्रद्धाचा हा पहिलाच सिनेमा आहे. याशिवाय शाहरुख मुंबईत त्याच्या ‘पठाण’चे शूटिंग करीत आहे. रणवीर सिंहही सिंबानंतर रोहित शेट्टीसोबत पुन्हा एकदा काम करीत असून या दोघांनी ‘सर्कस’ सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. अजय देवगणने तो दिग्दर्शन करीत असलेल्या आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘मे डे’ सिनेमाचे हैदराबादमध्ये शूटिंग सुरु केले आहे. जान्हवी कपूनेही तिच्या नव्या ‘गुड लक जेरी’ सिनेमाचे शूटिंग मुंबईत सुरु केले आहे.

नव्या वर्षात आतापर्यंत तीन मोठ्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी पहिला सिनेमा आहे अजय देवगनचा ‘थँक गॉड’. अजयने 7 जानेवारी रोजी त्याच्या ट्विटर अकाउंटवर या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात अजयसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकांमध्ये आहेत. 21 जानेवारीपासून या सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून याचे दिग्दर्शन इंद्रकुमार करणार आहे. 10 जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त ऋतिक रोशनने त्याच्या नव्या ‘फायटर’ सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण प्रथमच एकत्र काम करणार आहेत. 11 जानेवारी रोजी विक्की कौशलने त्याच्या ‘अश्वत्थामा’ या सायंस फिक्शन सिनेमाची घोषणा केली. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करीत आहे.

एकीकडे बॉलिवुड सिनेमांच्या शूटिंग आणि नव्या सिनेमांच्या घोषणांमध्ये बिझी असताना साऊथमध्ये मात्र नव्या मोठ्या सिनेमांच्या रिलीजचा धडाका लावण्यात आलेला आहे. रवी तेजाचा क्रॅक सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच विजय या सुपरस्टारचा सिनेमाही रिलीज झाला असून तो पाहाण्यासाठी प्रेक्षकांच्या सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर उत्पन्नाचा विक्रम करील असे म्हटले जात आहे. एकूणच भारतीय फिल्म इंडस्ट्रीने नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केल्याचीच ही चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER