कोरोनाचा नवा प्रकार : महाराष्ट्र हाय अलर्टवर, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीने बैठक

Uddhav Thackeray & Corona

मुंबई : देशभरात आणि राज्यात कोरोनाची (Corona) लाट ओसरली असल्याचे व कोरोनाची लस आल्याची आनंदाची बातमी येत असतानाच आता कोरोनाचा नवीन प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा रुग्ण आढळल्याचे बोलले जात आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने याबाबत सावधानता बाळगत महाराष्ट्र हायअलर्टवर आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर आज त्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोविड-१९ संसर्गाची परिस्थिती तसंच नव्या कोविड विषाणूंपासून कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या नव्या उपाययोजनांचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. पुढील महिन्यात भारतात लसीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पूर्व नियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New strain of virus in UK) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसांत कळेल. त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER