मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी नवे नियम, नियम न पाळणाऱ्यांवर गुन्‍हा दाखल होणार

मुंबई :- मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या (Corona) रुग्ण अचानक वाढू लागले आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सचेत झाली आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्‍त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. तसेच जे पालिकेच्या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. यानुसार आता मुंबईतलग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम घेताना पालिकेच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत. मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये 300 मार्शल्‍स नेमावेत. तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात,” यासह विविध सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.

कोविड-19 (COVID-19) अर्थात कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाच्‍या नवीन विषाणूने जगातील काही देशांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्‍ट्रात कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण वेगाने सुरु आहे. असं असतानाच मागील काही दिवसांत कोविड रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा वाढू लागल्‍याने मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्‍याचे निर्देश दिलेत.

इकबाल सिंह चहल यांनी आज (18 फेब्रुवारी 2021) महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त तसेच संबंधित अधिकारी यांच्‍यासमवेत दूरदृश्‍य प्रणाली (व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स) द्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्‍त चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणेला आवश्‍यक ते निर्देश दिले. इकबाल सिंह चहल म्‍हणाले, जून-जुलै 2020 मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड 19 संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड 19 प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे. कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्‍यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्‍यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER