
पुण्याहून रस्ते मार्गे जाण्यासाठी सध्या पाच-साडेपाच तास लागतात. त्यातही अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. पुण्यातून (Pune) निघता-निघता एक तासाहून अधिक वेळ लागतो. पुण्याहून थेट रेल्वेमार्ग नाही. आधी मनमाडला जा, मग तिथून गाडी बदलून किंवा वळवून नाशिकला जा, असा सव्यापसव्य करावा लागतो. आता ही कटकट संपण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्य शासन आणि रेल्वे विभागाची संयुक्त कंपनी असलेल्या महारेलने पुणे-नाशिक या २३४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाची उभारणी करण्याचे प्रस्तावित केले असून त्यासाठीचा आराखडादेखील तयार केला आहे. आज या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर एका बैठकीत करण्यात आले. हा सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असेल. ताशी १४० किलोमीटर इतका वेग राहील. या प्रकल्पावर १६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे विभाग आणि राज्य शासन संयुक्तपणे या खर्चाचा भार उचलेल.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकल्पासाठीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच सादर करा, असे आदेश आजच्या बैठकीत दिले. पुणे, हडपसर, मांजरी, कोलवडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुट, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहादरी, शिंदे आणि नाशिक रोड असा हा मार्ग राहील. एकूण २४ स्थानकं असतील. या रेल्वेमार्गामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक, कृषी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला