करणच्या घरी नव्या पाहुण्यांचा प्रवेश – जोहर अँड सन्स

मुंबई: बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर विवाहापूर्वीच जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. करण जोहरने सरोगसीद्वारे एक मुलगा आणि एका मुलगीला जन्म देत पितृसुख प्राप्त केले आहे. गेल्या महिन्यात या मुलांचा जन्म झाला होता. दरम्यान केंद्र सरकारच्या जन्म मृत्यू नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळावरून करण जोहरच्या मुलांच्या जन्माची पुष्टी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये करण जोहरच्या दोन्ही मुलांच्या नावांची नोंदणी झाल्याची माहिती दिली आहे.

अंधेरी पूर्व येथील मसरानी रुग्णालयात या मुलांचा जन्म झाला होता. करणने आपल्या वडलांच्या नावावरून मुलाचे नाव यश आणि मुलीचे नाव रुही असे ठेवल्याची माहिती मिळाली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या “अॅन अनसुटेबल बॉय” या आत्मचरित्रात करण जोहरने एका मुलाला दत्तक घेण्याची वा सरोगसीद्वारे बाप बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शुक्रवारी करण जोहरच्या जुळ्या मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केरकर यांनी दिली. दरम्यान, करण जोहरचा जवळचा मित्र असलेल्या शाहरुख खानचा मुलगा अबरामचा सरोगसीद्वारे मसरानी रुग्णालयातच जन्म झाला होता.