सुरक्षा व बचाव क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार: राज्यपाल

Governor inaugurates 30th Annual Global Conclave of Safety and Security Management

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सुरक्षा, बचाव व अग्निसुरक्षा उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशातील करोनाचे संकट लवकरच संपत आहे, मात्र राष्ट्रीय सुरक्षा व बचाव हा विषय संपणारा नाही. आगामी काळात सुरक्षा व बचाव उद्योग क्षेत्र नव्याने भरारी घेईल व या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari)यांनी आज व्यक्त केला.

इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट या अशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ३० व्या वार्षिक जागतिक परिषदेचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत राजभवन येथून झाले त्यावेळी ते बोलत होते.

सुरक्षा व बचाव क्षेत्रात कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खाजगी मनुष्यबळाला कार्यक्षमता वृद्धीसाठी नियमितपणे शास्त्रीय प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट ही जागतिक ख्यातीची संस्था शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करीत असतानाचा राष्ट्रीय सुरक्षेच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

करोनामुळे देशापुढे एकीकडे आव्हान निर्माण केले आहे तर दुसरीकडे नवनव्या संधी देखील उपलब्ध केल्या आहेत. आज भारत मास्क, पीपीई कीट व इतर वस्तू अनेक देशांना पुरवत आहे. त्याच धर्तीवर भारताने जगभरातील सुरक्षा व बचाव क्षेत्रातील संधींचा देखील लाभ घ्यावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट ही संस्था अनेक अनुभवी वरिष्ठ सैनिक अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ मनुष्यबळ पुरविणाऱ्या लहान मोठ्या शासकीय संस्था तसेच खाजगी सुरक्षा एजंसींना देखील व्हावा असे राज्यपालांनी सांगितले.

८० लक्ष लोकांना रोजगार

भारतातील खाजगी सुरक्षा क्षेत्र उद्योग अभूतपूर्व गतीने वाढत असून सध्या ८० लक्ष लोकांना रोजगार देत आहे व त्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा अधिकारी एस के शर्मा यांनी दिली.

इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंटचे कार्यकारी अध्यक्ष व माजी राज्यसभा सदस्य आर के सिन्हा, संस्थेचे महासंचालक व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी राजन मेढेकर, आयआयएसएसएम फाउंडेशनचे अध्यक्ष उदय सिंह तसेच सुरक्षा व बचाव क्षेत्रातील देशविदेशातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER