
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून नव्या कृषी कायद्यावरून आंदोलक शेतकऱ्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, शेतकर्यांना नवीन मार्ग मिळाला आहे. बऱ्याच विचारविनिमयानंतर भारताच्या संसदेने कृषी कायद्यांना ठोस आकार दिला. या सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होणार असून, नवीन हक्क, नवीन संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कृषी कायद्याला होत असलेला विरोध, कोरोना (Corona) संकट आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. मी एक चांगली बातमी सांगत आहे. आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडाहून परत आणण्यात आली आहे. याबद्दल मी कॅनडा सरकारचे आभार मानतो, असंसुद्धा मोदींनी अधोरेखित केलं.
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी संपू लागल्याचंही मोदी म्हणाले आहेत. देशात शेती आणि त्याच्याशी निगडित नव्या गोष्टी जोडल्या जात आहेत. कृषी क्षेत्रातील नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. या अधिकारांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या अडचणीदेखील दूर होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जितेंद्रचाही उल्लेख केला. त्याने मक्याची शेती केली आहे. व्यापा-यांनी त्याच्या मालाची किंमत ३ लाख ३२ हजार निश्चित केली होती. त्याला २५ हजार रुपयांचा अॅडव्हान्सही मिळाला. परंतु उर्वरित पैसे चार महिन्यांपर्यंत दिले गेले नाहीत. त्यानंतर जितेंद्रने नव्या कायद्याच्या मदतीने सर्व पैसे मिळवले, असा उल्लेखही मोदींनी केला.
नव्या कायद्यांतर्गत पीक खरेदीनंतर शेतकऱ्याला तीन दिवसांच्या आता पूर्ण पैसे द्यावे लागतात. जर तसे केले नाही तर तक्रार दाखल करता येते. एसडीएमलाही शेतकर्यांची तक्रार एका महिन्यात निकाली काढावी लागणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० नोव्हेंबरला होणाऱ्या गुरुनानक देव यांच्या ५५१ व्या प्रकाशपर्वाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, गुरुग्रंथ साहिबमध्ये असे म्हटले आहे की, ‘सेवक को सेवा बन आई’, म्हणजे सेवकाचे काम सेवा करणे. एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
ही बातमी पण वाचा : अनुसूचित जातीतील 60 लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला