जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही : शरद पवार

Sharad Pawar Governor - Maharastra Today

बारामती : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पहिला नाही.’ अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.

“राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेत राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे, ही जबाबदारी राज्यपालांची असते.” असे शरद पवार म्हणाले.

“महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीची आणि घटनेत असणारी जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी महाराष्ट्राने पाहिला नाही. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा तत्कालीन राज्यपालांनी त्रास दिला होता. मात्र, केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, हे चिंताजनक आहे.” अशी टीका शरद पवारांनी केली.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भाजपची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे. पाच राज्यांमधील राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल, हा ट्रेंड असून हा पाच राज्यांचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील
पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करत आहे. ममता बॅनर्जींवर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कोणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यांत भाजपचा पराभव होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER