धावा करतोय फवाद आलम आणि शिव्या मिळताय पाकिस्तानी निवडकर्त्यांना

Fawad Alam believes in his performances

फवाद आलम (Fawad Alam) नावाचा फलंदाज सातत्याने धावा जमवतोय आणि तेवढ्याच सातत्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे निवडकर्ते शिव्या खाताहेत. कोणताही फलंदाज धावा जमवत असेल, यशस्वी ठरत असेल तर निवडकर्त्यांची तर तारीफ व्हायला हवी पण शिव्या मिळताहेत..हे कसे काय? याला कारण स्वतः पाकिस्तानी (Pakistan) निवडकर्तेच आहेत कारण या पाकिस्तानी फलंदाजाने जुलै 2009 मध्ये कसोटी पदार्पण केले होते आणि पदार्पणातच श्रीलंकेविरुध्द (Srilanka) 168 धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर तो आणखी फक्त दोन कसोटी सामने खेळला आणि पाकिस्तानी संघातून वगळला गेला. त्यानंतर पुन्हा तो कसोटी सामना खेळला थेट आॕगस्ट 2020 मध्येच म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर. आणि आता पुनरागमनापासून पाच सामन्यात त्याने दोन शतकं झळकावली आहेत आणि म्हणूनच पाकिस्तानी निवडकर्ते शिव्या खाताहेत ते यासाठी की मधली 11 वर्षे ते आंधळे झाले होते का? त्यांना हा खेळाडू दिसत नव्हता का?

बरे या 11 वर्षात तो अपयशी होता असेही नाही. या काळातही त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 26 शतके आणि 33 अर्धशतके झळकावली आहेत आणि 56.48 च्या सरासरीने तब्बल 7965 धावा केल्या आहेत. या काळात पाकिस्तानने 88 कसोटी सामने खेळले आणि 40 नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली पण पदार्पणातच कसोटी शतक झळकावलेल्या फवाद आलमची त्यांना आठवण झाली नाही. या काळात पाकिस्तान क्रिकेट मंडळात सात निवडकर्ते बदलले पण एकालाही फवाद आलमचा पुन्हा विचार करावा असे वाटले नाही.

त्याचे फलंदाजीचे तंत्र तेवढे चांगले नाही, असे कारण देण्यात आले परंतु आता पुनरामनानंतर त्याने न्यूझीलंडविरुध्द 102 आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुध्द (South Africa) 109 धावांच्या खेळी करुन हा समज चुकीचा असल्याचे सिध्द केले आहे. विशेष म्हणजे त्याने तिन्ही शतकी खेळी केल्या तेंव्हा पाकिस्तानला संकटातून बाहेर काढले आहे.

पदार्पणात शतक केले होते त्यावेळी पहिल्या डावात पाकिस्तानी संघ अवघ्या 90 धावात बाद झाला होता आणि डावाअखेर दीडशे धावांनी ते पिछाडीवर पडले होते. त्यावेळी दुसऱ्या डावात त्याने 168 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुध्द 102 धावा केल्या तेंव्हा पाकिस्तानची स्थिती 3 बाद 37 होती आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुध्द मायदेशात 109 धावा केल्यात तेंव्हासुध्दा पाकिस्तानची 4 बाद 27 अशी स्थिती होती. 10 वर्षाच्या खंडानंतर एकापेक्षा अधिक कसोटी शतकं करणारा तो एकमेव फलंदाज आहे म्हणूनच इयान बिशपसारख्या नावाजलेल्या खेळाडूने म्हटलेय की, प्रत्येक वेळी मी फवाद आलमला धावा करताना बघतो तेंव्हा मला अतिशय आनंद होतो. त्याची जी 10 वर्षे वाया घालवली गेली ती कधीच परत येणार नाहीत पण आता या संस्मरणीय क्षणांचा आपण त्याच्यासोबत आनंद घेऊ शकतो.

क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनलेल्या या पुनरागमनाबद्दल स्वतः फवाद म्हणतो की, माझ्या नशिबात अशी संधी असेल तर ती कुणीच हिरावू शकणार नव्हता.

त्याच्या फलंदाजीच्या तंत्राबद्दल घेतली गेलेली शंका आणि पाकिस्तानच्या मधल्या फळीत मिसबा उल हक, युनीस खान, अझहर अली व असद शफिक अशा फलंदाजांमुळे त्याला संधीच दिली गेली गेली नाही पण गेल्या आॕगस्टमध्ये तो संघात परतला.

या मधल्या 11 वर्षांच्या प्रतीक्षेबद्दल फवाद म्हणतो की, मी कुणालाच दोष देणार नाही. माझ्या नशिबातच तसे असेल. आणि नशिबात जे असेल ते कुणीच बदलवू शकत नाही. मी फक्त मला जी कोणती संधी मिळेल, राष्ट्रीय स्तरावर का असेना, चांगली कामगिरी करायची एवढेच ठरवलेले होते. असे म्हणतात ना की अल्लाहकडे भलेही उशीर होईल पण मिळणार नाही असे होणार नाही. क्रिकेट हेच आमचे पोटपाणी आहे. म्हणून ही मधली 10 वर्षे वाया गेली असे मी मानत नाही. राष्ट्रीय स्तवार केलेल्या धावा आणि विक्रम काही कामाचे नव्हते असे आपण कसे म्हणू शकतो. त्यानेच तर मला आज जो काही आदर मिळतोय तो मिळवून दिलाय. कदाचित मला आता अधिक यश मिळेल म्हणून माझी कोणतीही तक्रार नाही आणि मी समाधानी आहे.

तब्बल 11 वर्षानंतर पुनरागमन केल्यानंतरही गेल्या महिन्यातील न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची पुन्हा निवड होईल की नाही याबद्दल शंकाच होती कारण इंग्लंडमध्ये तीन डावात फक्त 21 धावांनी त्याचे स्थान धोक्यात आले होते पण मिसबाने माझ्यावर विश्वास कायम राखला आणि न्यूझीलंड दौऱ्यावर मला संधी दिली. प्रशिक्षकाचे असे पाठबळ तुमचा उत्साह आणि विश्वास वाढवते असे फवादने म्हटले आहे.

कराची कसोटीत 109 धावा करताना त्याने अझहर अलीसोबत 94, मोहम्मद रिझवानसोबत 55 आणि फहिम अश्रफसोबत 102 धावांच्या भागिदारी केल्या. त्यामुळेच पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेवर आघाडी घेता आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER