तटस्थ मैदानांमुळे आयपीएलमध्ये संघांना बदलावी लागेल रणनीती

IPL -BCCI

आयपीएलच्या (IPL 2021) इतिहासात यंदा पहिल्यांदाच मायदेशात सामने होणार असले तरी तटस्थ स्थळी (Neutral Venues) होणार आहेत. मात्र त्यामुळे प्रत्येक संघाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे. संघनिवडीसाठीही वेगळा विचार करावा लागणार आहे. पूर्वी संघांना आपल्या १४ पैकी सात सामने घरच्या मैदानावर खेळायला मिळायचे. या मैदानाची, तेथील खेळपट्टी व तिच्या वर्तनाची संघांना माहिती असायची पण आता यंदा तसे नसेल.

मुंबईला फारसा फरक पडत नाही
आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ, मुंबई इंडियन्सचे सर्वांत जास्त पाच सामने चेन्नईत आहेत. याशिवाय त्यांना दिल्लीत चार, बंगलोरला तीन आणि कोलकाता येथे दोन सामने खेळायचे आहेत. सीएसकेप्रमाणेच मुंबई पलटणचाही मुंबई हा बालेकिल्ला होता; पण यंदा त्यांना बाहेरच खेळावे लागणार आहे. पण मुंबईचा संघ कोणत्याही मैदानावर भारी पडेल असा आहे. त्यांना पहिले पाच सामने चेन्नईच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळायचे आहेत. पण चेन्नईला २०११ पासून त्यांनी सामना गमावलेला नाही. चेपॉकवर त्यांनी सीएसकेला सलग पाच वेळा मात दिली आहे. त्यामुळे मुंबईला फारसा फरक पडेल असे वाटत नाही.

चेन्नई सुपर किंग्ज- फिरकीच्या पलीकडे बघावे लागेल
आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मुंबई, दिल्ली, बंगलोर व कोलकाता येथे सामने खेळायचे आहेत. त्यांचे सर्वाधिक पाच सामने मुंबईत व चार दिल्लीत होतील. सीएसके हा असा संघ आहे ज्याने आतापर्यंत घरच्या मैदानाचा सर्वाधिक फायदा उचलला आहे. चेपाॕकच्या खेळपट्टीवर कसे गोलंदाज यशस्वी ठरतील त्यावरच त्यांचा भर राहिलेला आहे. पण घरचे मैदान सोडून जेव्हा त्यांना गेल्या वर्षी अमिरातीत सर्व सामने खेळावे लागले तेव्हा त्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. २०१९ मध्ये घरच्या मैदानावर निम्मे सामने होते तेव्हा त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी १९.६६ च्या सरासरीने ६२ विकेट काढल्या होत्या. अमिरातीत हेच आकडे २० आणि ४०.१५ असे बदलले. यंदा त्यांचे १० सामने मुंबई, बंगलोर व कोलकाता येथील फलंदाजीला पोषक मैदानांवर होणार आहेत. त्यामुळे सीएसकेला विजयासाठी फिरकी गोलंदाजांच्या पलीकडचा विचार करावा लागणार आहे. शिवाय फलंदाजीही मजबूत करावी लागणार आहे; कारण या तीन मैदानांवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १७५ ची आहे.

दिल्लीसाठी जलद गोलंदाज महत्त्वाचे
अमिरातीत चांगली कामगिरी केलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे (DC) सामने मुंबई, चेन्नई, अहमदाबाद व कोलकाता येथे आहेत. पाच सामने कोलकात्याला तर चार अहमदाबादला आहेत. त्यांच्याकडे आर. अश्विन, अमित मिश्रा व अक्षर पटेल असा चांगला फिरकी मारा आहे. यापैकी अक्षर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुरुवातीच्या काही सामन्यात तो नसेल. कोलकात्यात जलद गोलंदाजांचा स्ट्राईक रेट सर्वांत जास्त आहे आणि त्याच ठिकाणी दिल्लीचे पाच सामने आहेत. त्यामुळे त्यांना जलद गोलंदाजीवर जोर द्यावा लागणार आहे. यामुळे आनरीच नोर्जे व कासिगो रबाडाची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. अहमदाबादला त्यांना अष्टपैलूंना प्राधान्य द्यावे लागेल तर चेन्नईत फिरकीवर जोर द्यावा लागेल.

कोलकातासाठी बंगलोर ठरणार लकी?
कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) पाच सामने बंगलोरला, चार अहमदाबादला, दोन मुंबईत आणि तीन चेन्नईत आहेत. ओईन माॕर्गन कर्णधार आहे. त्यामुळे इंग्लंडसारख्या आक्रमक फलंदाजीला त्यांचे प्राधान्य राहील. सुदैवाने बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या सीमा जवळ आहेत आणि या मैदानावर केकेआरने गेल्या सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. अहमदाबादच्या नव्या मैदानाचा अलीकडच्या पाच टी-२० सामन्यांमुळे माॕर्गनला आता अनुभव आहेच. पण ईडन गार्डनवर त्याची जी जलद गोलंदाजांवर मदार रहायची तसे आता चालणार नाही. तशी परिस्थिती लोकी फर्ग्युसन, पॕट कमिन्स व प्रसिद्ध कृष्णा यांना इतरत्र मिळणार नाही. त्यामुळे फलंदाजीत नाही; पण गोलंदाजीत केकेआरला रणनीती बदलावी लागणार आहे.

पंजाबसाठी आक्रमक फलंदाज फायद्याचे
पंजाब किंग्जला (Kings Punjab) पाच सामने बंगलोरला, चार सामने अहमदाबादला, तीन सामने मुंबईत व दोन सामने चेन्नईत खेळायचे आहेत. पंजाबची अशीही घरच्या मैदानांवर कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. पण त्यांचे आठ सामने छोट्या मैदानांवर होणार आहेत. याचा अर्थ आक्रमक फलंदाजांना प्राधान्य द्यावे लागेल. निकोलस पूरन, के.एल.राहुल, मयंक अगरवाल व ख्रिस गेल त्यांच्याकडे असल्याने त्यांना फारशी चिंता असू नये.

राजस्थान रॉयल्सची झाली अडचण
राजस्थान रॉयल्स (RR) मुंबईत पाच, दिल्लीत चार कोलकाता येथे तीन व बंगलोरला दोन सामने खेळणार आहेत. मुंबईप्रमाणेच आरआरची कामगिरी त्यांच्या घरी म्हणजे जयपूरला चांगली होत आली आहे. जयपुरातील २००८ पासूनचे ३८ पैकी २९ सामने त्यांनी जिंकले आहेत. पण त्यानंतर सलग चार वर्षे जयपूरला फाटा दिल्यानंतर २०१८ पासून जयपुरात त्याचे आठ विजय व सहा पराभव आहेत. मुंबईतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्यांना जखमी जोफ्रा आर्चरची उणीव जाणवेल आणि जलद गोलंदाजीचा भार ख्रिस मॉरिसवर राहील. दिल्लीत त्यांना फिरकीवर जोर द्यावा लागेल. एकूण बाहेर सामने खेळायचा राजस्थानला फटका बसेल असा अंदाज आहे.

बंगलोरच्या फलंदाजांना संयम बाळगावा लागेल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) संघ चेन्नईत तीन सामने खेळल्यानंतर मुंबईत दोन, अहमदाबादला चार आणि कोलकात्यात सर्वाधिक पाच सामने खेळेल. चिन्नास्वामी स्टेडियमवर आक्रमक फलंदाजीची सवय असलेल्या बंगलोरच्या फलंदाजांना मुंबई व अहमदाबादमध्ये त्या गतीने धावा जमविणे जमणार नाही. अहमदाबादला अलीकडेच खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा अनुभव विराट कोहलीला कामी येणार आहे. कोलकात्यात मात्र त्यांना जलद गोलंदाजांवर भर द्यावा लागणार आहे.

सनरायजर्ससाठी बदल फायद्याचाच
सनरायजर्स हैदराबाद (SRH) पाच सामने चेन्नईत खेळून सुरुवात करेल. त्यानंतर दिल्लीत चार, कोलकाता येथे तीन व बंगलोरला त्यांचे दोन सामने आहेत. सनरायजर्सची गोलंदाजी चांगलीच भक्कम आहे. त्यामुळे गोलंदाजांवरच त्यांची मदार असेल. चेन्नई व दिल्लीत त्यांना नऊ सामने खेळायचे आहेत. स्पष्टच आहे, फिरकी गोलंदाज महत्त्वाचे ठरतील. शिवाय त्यांच्याकडे डेव्हिड वाॕर्नर, केन विल्यमसन, जाॕनी बेयरस्टो व मनीष पांडेसारखे फिरकी चांगली खेळून काढणारे फलंदाज आहेत. राशिद खान, मुजीबूर रहमान व मोहम्मद नबीसारखे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे सुरुवातीला तरी हैदराबादचा संघ यशस्वी ठरताना दिसला तर आश्चर्य वाटू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button