नेत्रा कुमाननची नौकानयनात ऐतिहासिक कामगिरी

नेत्रा कुमानन (Nethra Kumanan) हिने भारतासाठी नौकायनात ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ऑलिम्पिकमधील शिडाचे नौकायन(Sailing) या स्पर्धाप्रकारासाठी पात्र ठरणारी ती पहिला भारतीय महिला ठरली आहे. ओमान येथील आशियाई पात्रता स्पर्धेत लेसर रॅडियल (Laser Radial) स्पर्धाप्रकारात पहिले स्थान निश्चित करून तिने ही पात्रता मिळवली आहे.

२३ वर्षीय नेत्राकडे पात्रता स्पर्धेतील दुसऱ्या स्थानावरील स्पर्धकापेक्षा २१ गुणांची  आघाडी आहे आणि अद्याप एक शर्यत बाकी आहे. दुसऱ्या स्थानी भारताचीच रम्या सर्वानन आहे. ओमान येथील ही स्पर्धा आशिया व आफ्रिकन खेळाडूंसाठी संयुक्त ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे. सध्या नेत्राचे १८ गुण  आहेत तर रम्याचे ३९. सेलिंगमध्ये ज्याचे कमी गुण असतात तो विजेता ठरतो. लेसर रॅडियल या प्रकारात एकच जण नौका चालवत असतो.

आशियाई सेलिंग महासंघाचे अध्यक्ष मलव श्रॉफ यांनी नेत्रा कुमानन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याची पुष्टी केली आहे.

शेवटची शर्यत २० गुणांची असेल; पण नेत्राकडे आधीच २१ गुणांची आघाडी असल्याने तिचे विजेतेपद निश्चित आहे. दोन वेळचे ऑलिम्पियन हंगेरीचे थाॕमस एस्झेस हे नेत्राचे प्रशिक्षक आहेत.

कुमानन ही ऑलिम्पिक सेलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी १०वी खेळाडू पण पहिलीच महिला असेल. सेलिंगमधील भारताच्या आधीच्या ९ ऑलिम्पिकपटूंमध्ये नछतरसिंग जोहाल (२००८), मलव श्रॉफ व सुमीत पटेल (२००४), फारोख तारापोर व सायरस कामा (१९९२), केली राव (१९८८), ध्रुव भंडारी (१९८४), सोली काँट्रॕक्टर आणि ए.ए. बसिथ (१९७२) यांचा समावेश आहे.

श्रॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार टोकियो ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरलेली एकमेव भारतीय आहे. इतर सर्व ९ ऑलिम्पियन हे कोटा पद्धतीने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. इतर सर्व ९ जण हे कोट्याच्या जागा रिक्त राहिल्याने स्थान मिळालेले होते. मलव श्रॉफ हे स्वतः २१ व्या स्थानी होती आणि ऑलिम्पिकमध्ये फक्त २० खेळाडूंचीच स्पर्धा होती. त्यापैकी कुणी तरी सहभागी झाले नाही म्हणून मला संधी मिळाली होती, असे श्रॉफ यांनी सांगितले. मात्र नेत्रा कुमानन ही पात्रता स्पर्धेतून ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलेली पहिली भारतीय (पुरुष वा महिला) आहे.

आणखी दोन भारतीयांना ऑलिम्पिक पात्रतेची संधी आहे.  त्यापैकी एक गणपती केलापंडा चेंगप्पा आहे जो ४९ इआर क्लास स्पर्धेत आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button