राज्याला ग्रासलेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावरही येणार वेबसीरीज

जगभरात विविध स्कॅम्स (Various scams) झाले आणि स्कॅम्स करणाऱ्यांनी यातून कोट्यावधींची माया गोळा केली. मात्र त्यांचे पितळ उघडे पडल्यानंतर मात्र अशा लोकांना तुरुंगात खितपत पडावे लागले. सध्या विजय मल्ल्या, मेहुल चोकसी, नीरव मोदी यांची नावे अशा स्कॅम्समुळेच चर्चेत आहेत. हे तिघेही सध्या परदेशात असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. हर्षद मेहता या शेअर बाजारातील दलालाने केलेला कोट्यावधींचा स्कॅम अजूनही लोकांच्या लक्षात आहे. जे विसरले होते त्यांच्यासाठी प्रख्यात निर्माता- दिग्दर्शक हंसल मेहताने हर्षद मेहताच्या जीवनावर ‘स्कॅम 1992’ वेबसीरीज बनवून पुन्हा त्याची आठवण ताजी केली होती. ही वेबसीरीज प्रचंड गाजली होती. प्रतीक गांधीने हर्षद मेहताची भूमिका खूपच उत्कृष्टपणे साकारली होती. हर्षद मेहताच्या स्कॅमप्रमाणेच राज्यात तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रचंड गाजला होता. या घोटाळ्यामुळे दोन राज्य सरकारांना सत्ता सोडावी लागली होती. याच स्टॅम्प घोटाळ्यावर हंसल मेहता (Hansal Mehta) आता वेबसीरीज घेऊन येणार आहे.

कर्नाटकच्या खानापूर येथे जन्मलेल्या कुख्यात अब्दुल करीम तेलगीने देशात खोटे स्टॅम्प पेपर पुरवण्यासाठी मोठे नेटवर्क तयार केले होते. यासाठी त्याने टाकसाळीत नोटा छापणारे एक जुने मशीन विकत घेतले होते आणि त्याचा वापर करून खोटे स्टॅम्प पेपर तो छापत असे. यासाठी त्याने महाराष्ट्रात एक कारखाना सुरु केला होता. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला होता. या प्रकरणात बॉलिवूडमधील एका सुपरस्टारच्या पत्नीचे आणि एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव समोर आले होते. हा नेता राज्यात सरकार कोणाचेही असो तो मंत्रीपदी वर्णी लावून घेण्यात एक्सपर्ट होता. तेलगीने या बोगस स्टॅम्प पेपर घोटाळ्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तेलगीच्या स्टॅम्प घोटाळ्यावर पत्रकार संजय सिंह यांनी ‘रिपोर्टर की डायरी’ नावाने एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी स्टॅम्प ड्यूटी घोटाळ्याची खडा न खडा माहिती दिली आहे. या पुस्तकावर आधारितच ही वेबसीरीज असणार आहे. या वेबसीरीजच्या निर्मात्यांनी तेलगी घोटाळ्याचा तपास करणारे सीबीआई अधिकारी अरुण कुमार यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. हंसल मेहतांची ही वेबसीरीज महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासावर जास्त भर देणार आहे. या वेबसीरीजचे नाव ‘स्कॅम 2003: द क्यूरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’. वेबसीरीजचे लिखाण करण्यासाठी यज्ञोपवीत यांना साईन करण्यात आले आहे.

या वेबसीरीजबाबत माहिती देताना हंसल मेहता यांनी सांगितले, ‘सध्या कथेवर काम सुरु असून कथा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची निवड केली जाईस. या वेबसीरीजचे साधारणतः डिसेंबरपासून आम्ही शूटिंग सुरु करू. देशात गाजलेला आणखी एक घोटाळा आम्ही या वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. यासाठी मी खूपच उत्साहित आहे असेही हंसल मेहता यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER