नेपाळी खुनाच्या आरोपीची ४१ वर्षांनंतर झाली सुटका

Calcutta High Court
  • खटला चालविण्याएवढी बौद्धिक क्षमता नाही

कोलकाता : खुनाच्या आरोपावरून कच्चा कैदी म्हणून गेली ४१ वर्षे तुरुंगात असलेल्या एका नेपाळी नागरिकाची खटला चालविण्याएवढी बौद्धिक क्षमता नाही हे लक्षात घेऊन कोलकाता उच्च न्यायालयाने (Kolkata High Court) त्याची सुटका केली आहे.

दीपक चंपका जैशी, असे या नेपाळी नागरिकाचे नाव असून तो आता ७० वर्षांचा आहे. सन १९८१ मध्ये भारतात आला असता दार्जिलिंग जिल्ह्यात त्याला खुनाच्या आरोपावरून अटक झाली. खटला प्रलंबित असल्याने कच्चा कैदी म्हणून गेली चार दशके त्याला प. बंगालमधील विविध कारागृहांत ठेवले गेले. मुख्य न्यायाधीश न्या. टी. बी. राधाकृष्णन व न्या. अनिरुद्ध रॉय यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार दीपक जैशी यांची डमडम मध्यवर्ती कारागृहातून सुटका करून त्यांना प्रकाश चंद्र शर्मा तिमसिया या बंगालमध्येच राहणाऱ्या त्यांच्या चुलतभावाच्या ताब्यात देण्यात आले. स्वत: दीपक यांच्याकडून जामिनाचे कोणतेही हमीपत्र घेणे शक्य नसल्याने न्यायालय सांगेल तेव्हा त्याला हजर करण्याचे अभिवचन प्रकाश यांच्याकडून लिहून घेण्यात आले.

नेपाळ सरकारचे कोलकाता येथील वाणिज्य दूतावास व भारत सरकार यांनी दीपक यांना नेपाळला परत पाठविण्याची सर्व सोय करावी, असाही आदेश दिला गेला. तेथे ते त्यांच्या ९० वर्षांच्या आईसोबत राहू शकतील.

अटक झाल्यानंतर लगेचच दीपक यांची वैद्यकीय तपासणी केली असता गतिमंद असल्याने ते खुनाच्या खटल्याला सामोरे जाण्यास असमर्थ आहेत, अस दिसले होते. आता गेल्या जानेवारीत न्यायालयाने त्यांची पुन्हा तपासणी करून घेतली तेव्हा त्यांचा बुद्ध्यंक (IQ) ९ वर्षे ९ महिन्याच्या मुलाएवढा असल्याचे आढळून आले. अशा अवस्थेत त्यांच्यावर खटला चालविणे शक्य नसल्याने त्यांना कच्चा कैदी म्हणून तुरुंगात ठेवण्यातही काही हशील नाही, असे म्हणून न्यायालयाने त्यांना सोडण्याचा आदेश दिला. प. बंगाल राज्य विधिसेवा प्राधिकरणाने (State Legal Services Authority) दीपक यांचे प्रकरण न्यायालयापुढे आणून त्यांच्या सुटकेसाठी पाठपुरावा केला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER