नेपाळभूमीतही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ

जगातील 49 वा देश, ओमानविरुध्द खेळले सामना

Nepal on international cricket map

क्रिकेटची दुनिया विस्तारत आहे. अधिकाधिक देशांमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे. नेपाळची आता त्यात भर पडली आहे. नेपाळमधील किर्तीपूर येथे त्रिभुवन विद्यापीठाच्या मैदानावर बुधवारी नेपाळमधील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. त्यात ओमानने 18 धावांनी विजय मिळवला. आयसीसीच्या विश्वचषक लीग -2 च्या या सामन्यानिमित्ताने नेपाळ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेलेला जगातील 49 वा देश ठरला.

नेपाळमध्ये पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार असल्याने कीर्तीपूरमध्ये उत्सवाचे वातावरण होते. नेपाळ म्हटले की सर्वप्रथम गिर्यारोहण व ट्रेकिंगची आठवण होते पण आता त्यात क्रिकेटची भर पडली आहे. नेपाळने आठ वर्षात पाचव्या डिव्हिजनपासून आयसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट लीगपर्यंत प्रगती केली आहे. 2018 मध्ये त्यांना अधिकृत वन डे क्रिकेट संघाचा दर्जा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने दिला आहे. तेंव्हापासून त्यांनी देशाबाहेर बरेच आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत पण बुधवारी, 5 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला. त्यामुळे नेपाळमधील क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला उधाण येणे स्वाभाविक होते. 18 महिन्यांपूर्वी नेपाळने नेदरलँडमधील अॕमस्टेलव्हीन येथे पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर दुबईत त्यांनी पहिली मालिकासुध्दा जिंकली. त्यानंतर आता नेपाळने आपल्या घरच्या मैदानावर सामन्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे नेपाळमध्ये सहसा येणाऱ्या प्रत्येकच पर्यटकाला ट्रेकिंगला कुठे जाणारा हा सवयीने विचारला जाणारा प्रश्न आता क्रिकेटचा सामना बघायला आलात का, असासुध्दा होऊ शकतो.

कीर्तिपूर हे काठमांडूचे उपनगर. तेथील त्रिभुवन विद्यापीठाचा मैदानावर हा सामना खेळला गेला. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जवळपास 750 मीटर,उंच चढून गेल्यावर हे मैदान आहे त्यामुळे या मैदानापर्यंत जाण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे मोटारसायकलच आहे. नेपाळचे क्रिकेटपटू मोटारसायकलीनेच मैदानावर जातात. प्रेक्षक मात्र साधारणपणे सरासरी पाच अंश सेल्सिअस तापमानात पायीच चालत जातात.म्हणजे क्रिकेट बघायला जाताना ट्रेकिंग आपोआपच होऊन जाते. स्टेडियमही साधेसुधे…खुर्च्या नाहीत, गॕलरी नाहीत फक्त मैदानाच्या चौफेर,असलेल्या उंच जमिनीवर मस्तपैकी गवतावर लोळत किंवा बसत सामन्याचा आनंद घ्यायचा.

दहा वर्षांपूर्वी याच मैदानावर डिव्हिजन-5 चा अमेरिका वि. नेपाळ हा सामना झाला होता मात्र तो नेपाळी प्रेक्षकांची हुल्लडबाजी व दगडफेकीसाठीच गाजला होता. मात्र यावेळी ओमानकडून पराभव झाला असला तरी नेपाळी प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले नाही आणि चांगल्या खेळाचे कौतुकच केले. याच मैदानावर आता येत्या शनिवारी नेपाळचा सामना अमेरिकेशी आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेलेले देश

1) आॕस्ट्रेलिया, 2) बांगलादेश, 3) बेल्जियम, 4) बर्म्युडा, 5) कॕनडा, 6)डेन्मार्क, 7) इंग्लंड, 8) फिनलंड, 9) हाँगकाँग, 10) गर्नसी*, 11) ग्रीस, 12) भारत, 13) आयर्लंड, 14) केनिया, 15) मलावी, 16) मलेशिया, 17) माल्टा, 18) मेक्सिको, 19) मोराक्को, 20) नामिबिया, 21) नेपाळ, 22) नेदरलँड, 23) न्यूझीलंड, 24) ओमान, 25) पाकिस्तान, 26) पापुआ न्यू गिनी, 27) पेरु, 28) कतार, 29) रुमानिया, 30) सामोआ, 31) स्कॉटलँड, 32) सिंगापूर, 33) स्पेन, 34) श्रीलंका, 35) युगांडा, 36) दक्षिण आफ्रिका, 37) युएई, 38) अमेरिका, 39) वेस्ट इंडिज **, 40) झिम्बाब्वे

गर्नसी हा ब्रिटीश स्वायत्त प्रांत आहे.

वेस्ट इंडिजमध्ये गुयाना, अँटिग्वा, सेंट व्हिन्सेंट, सेंट ल्युसिया,बार्बेर्डोस, ग्रेनेडा,त्रिनिदाद, जमैका, सेंट किटस्, डॉमिनिका या छोट्या छोट्या देशांचा समावेश आहे.