माजी खासदार राजू शेट्टी यांना नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार जाहीर

Raju Shetty

सांगली : श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट, सांगली यांचेवतीने प्रतीवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘ स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार – २०२०’ यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना शेतकरी, कष्टकरी चळवळीच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबदद्ल दिला जाणार आहे.25 हजार रुपये रोख ,मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्व. राजमती नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार – २०२० ‘ सहयाद्री फार्मर्स प्रोडयूसर कंपनी लि. मोहाडी, नाशिक चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना कृषी व उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्यवद्दल दिला जाणार आहे. पुरस्काराचे वितरण श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी जे.बी.पाटील,पुणे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे मानद सचिव, माजी महापौर सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

१९९२ सालापासून श्रीमती राजमती नेमगोडा पाटील ट्रस्टच्यावतीने हे सन्माननीय पुरस्कार सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक तसेच तळागाळातील लोकांच्यासाठी कार्य करणा-या व्यक्तीस देण्यात येत आहेत. यंदाचा २९ वा पुरस्कार वितरण सोहळा स्व.नेमगोंडा दादा पाटील यांच्या ४७व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सांय ४ वाजता राजमती भवन, नेमिनाथनगर, सांगली येथे होणार आहे.