कायद्याचं नाव ‘दिशा’ऐवजी ‘शक्ती’ का करण्यात आलं हे सांगण्याची गरज नाही – नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई :- महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी ‘शक्ती’ नावाचे दोन कायदे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारनं घेतला आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा राज्य मंत्रिमंडळातील युवा मंत्र्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक ट्विट  करून या कायद्याचं स्वागत केलं आहे. ‘महाराष्ट्र सरकार ‘शक्ती’ नावाचा कायदा आणत आहे हे ऐकून आनंद झाला. कायद्याचं नाव ‘दिशा’ऐवजी ‘शक्ती’ का करण्यात आलं हे सांगण्याची गरज नाही. मात्र, या कायद्यांतर्गत कारवाई करताना निवडक प्रकरणांचा विचार होणार नाही अशी आशा आहे. प्रत्येक प्रकरणाला एकसमान न्याय द्यायला हवा, मग त्या प्रकरणात एखादा तरुण मंत्री संशयित असला तरी…’ असं नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियन आत्महत्याप्रकरणात भाजपनं अप्रत्यक्षपणे मुंबईतील एका तरुण मंत्र्यावर आरोप केले होते. त्यांचा रोख थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडं होता. यातूनच या प्रकरणांची चौकशी सीबीआयकडं देण्याची मागणी भाजपनं लावून धरली होती. कालांतरानं सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडं देण्यात आलं. मात्र, बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन वगळता अद्याप या प्रकरणातून ठोस काहीच हाती आलेलं नाही. असं असलं तरी भाजपच्या काही नेत्यांकडून अधूनमधून आरोप सुरूच असतात. नितेश राणे यांच्या ट्विटचा रोखही आदित्य ठाकरे यांच्याकडंच असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER