
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत माणुसकी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी तुरुंग अधिकार्यांना संवेदनशील करण्यासाठी विशेष धडे देण्याची गरज प्रतिपादित केली. प्रतिबंधित माओवादी संघटनांच्या कथित छुप्या समर्थनाने दोन वर्षांपूर्वी पुण्यात आयोजित केलेल्या ‘एल्गार परिषदे’च्या संदर्भात राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (NIA) अटक केलेल्या रमेश गायचोर आणि सागर गोरखे या आरोपींनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले.
याच प्रकरणात अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांचा संदर्भ देत न्या. शिंदे म्हणाले की, नवलखा यांचा चष्मा तळोजा कारागृहात चोरीला जाणे आणि त्याबदल्यात कुटुंबियांनी पाठविलेले दुसर्या चष्म्याचे पार्सल स्वीकारण्यास तुरुंग अधिकार्यांनी नकार देणे यासंबंधीच्या बातम्या आम्ही वाचल्या. या माणुसकीने वागण्याच्या गोष्टी आहेत. अशा लहानसहान गोष्टींपासून कैद्यांना वंचित कसे काय केले जाऊ शकते?
न्या. शिंदे म्हणाले की, माणुसकी ही सर्वात महत्वाची आहे. बाकीच्या गोष्टींचा विचार नंतर केला जाऊ शकतो. तुरुंगातील कैद्यांच्या मुलभूत गरजांविषयी संवेदनशील करण्यासाठी तुरुंग अधिकार्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची गरज आहे, असे वाटते.
नवलखा यांच्या कुटुंबाने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नवलखा यांचा चष्मा तुरुंगात चोरीला गेल्याचा आणि कुटुंबाने पाठविलेला दुसरा चष्मा अधिकाºयांनी न स्वीकारता परत पाठविल्याचा आरोप केला होता. चष्मा नसल्याने नवलखा यांची अवस्था आंधळ््यासारखी झाली आहे व परिणामी त्यांचा रक्तदाब वाढला आहे, असा दावाही कुटुंबियांनी केला.
गायचोर व गोरखे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्य आरोपींच्या विरुद्ध दंडाधिकार्यांपुढे जबानी देण्यास नकार दिला एवढ्याच कारणाने त्यांना अटक केली गेली आहे, असा आरोप त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी केला. हे प्रकरण पुण्यातील आहे व पुण्यातही ‘एनआयए’चे विशेष न्यायालय आहे. त्यामुळे हे प्रकरण मुंबईत चालविणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. ‘एनआयए’चे प्रॉसिक्युटर संदेश पाटील यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला