कोविड लसीकरण अभियान चालविणे आवश्यक – नितीन गडकरी

Nitin Gadkari

नागपूर :- कोविड संक्रमण (Coronavirus) रोखण्यासाठी लसीकरण (Covid-19 vaccination) महत्त्वाचे असून लसीकरणाबाबत अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. ही भीती दूर करून लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी एक अभियानच चालविले जावे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. प्रभाव्य इंडस्ट्रीजच्या ऑक्सिजन प्लांटच्या कोनशिला अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या आभासी कार्यक्रमाला उप्रचे उपमुख्यंमत्री केशवप्रसाद मौर्य, सिद्धार्थनाथ सिंग, महेंद्रसिंग, उमेश जयस्वाल, वीरेंद्रसिंग आदी उपस्थित होते.

आमच्यातीलच एका कंत्राटदाराने हा प्लांट सुरू करणे म्हणजे सामाजिक दायित्व निभावण्यासारखे आहे. समाजाप्रती समर्पित भावनेने केलेले हे कार्य असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची आता आवश्यकता आहे. ५० बेड्सपेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयांना हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट सुरू करणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सिलेंडरची बँक सुरू व्हावी. सिलेंडर उपलब्धतेतही आपण स्वयंपूर्ण असावे. कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरही उपयोगी आहे. ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची बँक आम्ही सुरू केली आहे. या काळातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असलेला पाहून या इंजेक्शनची निर्मिती करून लोकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. आता म्युकरमायकोसिससाठी लागणारे एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची निर्मिती करून हेही रुग्णांसाठी १,२५० रुपयांत उपलब्ध करून दिले. याशिवाय अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध करून दिल्या असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

आतापर्यंत कोविडच्या रुग्णांना आवश्यक असलेले ९० कोटी रुपयांचे वैद्यकीय साहित्य आपण वितरित केले असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, तिसरी लाट आली तर आपली तयारी असावी म्हणून जिल्हाश: तयारी केली पाहिजे. लसीकरणाचे अभियान चालवणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण केंद्र पार्किंगच्या जागांमध्ये, मोठ्या सभागृहांमध्ये सुरू व्हावे व लोकांना त्यासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये अशी व्यवस्था व्हावी. राजकारणाचा अर्थ राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण आहे. शिक्षण, आरोग्य व सेवा क्षेत्रात दरिद्रनारायणाची सेवा हीच ईश्वरसेवा व हेच राजकारण आहे. सत्ताकारणाला आम्ही राजकारण समजतो. पण राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे, हाच आमचा उद्देश. पं. दीनदयालजी उपाध्याय यांचे सामाजिक, आर्थिक चिंतन आमची जीवननिष्ठा आहे, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : स्वदेशी व स्वावलंबनाच्या आधारावर देश आत्मनिर्भर व्हावा : ना. गडकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button