राजकारण विसरून आता विकास करण्याची गरज : नितीन गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : लोकसभेचे निकाल जाहीर होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसार माध्यमांशी बोलले. ते म्हणाले, कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ही बातमी पण वाचा :- भाजपच्या विजयावर मोदी म्हणाले…

लोकांची कामे करताना आपण कधीही भेदभाव ठेवला नाही. जातीधर्माचा विचार केला नाही. आपल्याकडे कामे घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती ही सर्वप्रथम या देशाची नागरिक आहे, नंतर ती कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, ही प्रामाणिक भावना ठेवून लोकांची मी कामे केली. त्याचेच फळ म्हणून नागपूरकरांनी माझ्या झोळीत मतांचे दान टाकले, असेही गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघांनीही नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. पुढील पाच वर्षात नागपूरचा जगात नावलौकिक कसा वाढेल या दृष्टीने आमचे सर्वांचेच प्रयत्न राहतील. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपुरात जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यावर भर राहणार आहे. नागपूर ‘मेट्रो’ला सुरुवात झाल्याने शहराचा दर्जा वाढला आहे, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : आता विधानसभा लढवा, नंतरच राजकारणातून संन्यास घ्या ; गडकरींचा पटोलेंना टोला