राष्ट्रवादीचा विजयरथ सुसाट, शिवसेनेचे 19 पैकी 17 उमेदवार बाद

Shivsena & NCP

उस्मानाबाद : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच गावातील गाव पुढाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे मात्र, जिल्ह्यातील बलसुर या गावात वेगळं चित्र बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) पॅनलचे 19 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची (NCP) एकहाती सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या बलसूर गावात हा प्रकार समोर आला आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दरम्यान, शिवसेनेच्या पॅनलच्या 19 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गटाची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

बलसूर येथील पाच प्रभागात पंधरा उमेदवारांसाठी निवडणूक होणार होती. या पंधरा जागेसाठी एकूण 43 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 17 नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने फक्त 26 नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

उमेदवारी अर्जावर अनुक्रमांक व प्रभाग क्रमांक चुकीचा देणे, साक्षीदार सही घेतली नसल्याचे कारण देत, त्याचबरोबर अपत्य स्वयंघोषणापत्र नसणे, अशिक्षित असल्याचे शपथपत्र न देणे, ठेकेदारी करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र नसणे, परिशिष्ट दोनची नोटरी नसल्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज बाद ठरविले आहेत. हे 17 अवैध ठरलेले नामनिर्देशन पत्र बब्रुवान चव्हाण व सुरेश मुझे यांच्या गटाचे होते. हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या विरोधी गट मानले जातात. त्यामुळे बिराजदार यांच्या गटाचा मार्ग सुकर झाला आहे.

दरम्यान, राज्यात एकत्र सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गटात च गोंधळ झाला असून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या गावातच हा प्रकार झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना युतीवर काही परिणाम होतो का हे बघावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER