राष्ट्रवादीची शिवसेनेला मदत, बेळगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा शेळकेंना पाठिंबा

Uddhav Thackeray - Sharad Pawar - Maharastra today
Uddhav Thackeray - Sharad Pawar - Maharastra today

बेळगाव : केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने अवघ्या 26 वर्षीय शुभम शेळके यांना मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने शेळके यांच्यामागे सर्व ताकद लावली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेळके यांना पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज बेळगाव येथे माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. बेळगाव सीमा प्रश्नावर अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. सीमाभागातील मराठी बांधवाना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मराठी उमेदवार म्हणून शेळके यांना पाठिंबा दिला आहे. सीमाप्रश्नावर शिवसेनेने मोठे आंदोलन केले, बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे शिवसेना पाठिंबा देत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेळकेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र फडणवीसांनीही अशी भूमिका घेण्याची नव्हती. ते केवळ दिल्लीश्वरांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेली भूमिका आठवायला हवी होती. भाजप मागील पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होती, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शिवाय आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम फडणवीस यांनी इथे येऊन केले आहे, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.

शरद पवार, नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठी जणांच्या हक्कासाठी या भागात आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जणांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहतो, हा पाठिंबाही त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितलं. मराठी माणसांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढवली होती. इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल याबाबत शंका नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button