राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण? सुप्रिया सुळेंच्या पक्षातील वाढत्या सक्रियतेमुळे चर्चा

Sharad Pawar-Supriya sule

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधून आघाडीचे  सरकार सत्तेत आणले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सरकार असले तरी संपूर्ण नियंत्रण शरद पवार यांच्या हातात असल्याची चर्चा आहे. अशातच पवार यांनी आपल्या मंत्र्यांना पक्ष कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेला तत्काळ मान्य करत मंत्र्यांनी जनता दरबारदेखील सुरू केले. पण त्याच वेळी सुप्रिया सुळेदेखील दर मंगळवारी पक्ष कार्यकर्ते आणि लोकांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. राष्ट्रवादी पक्षात अजून एक सत्ताकेंद्र त्यांच्या रूपात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी सुप्रिया सुळे असतील का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापण्यापासून तर सरकारच्या  कामकाजाबाबत एक व्यक्ती कायम सक्रिय दिसली; त्या म्हणजे सुप्रिया सुळे. आघाडी सरकार असताना केंद्रीय राजकारणात सुप्रिया सुळे रमल्या होत्या. राज्यात युवती काँग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचा वावर होता. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर मात्र त्या  राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते पहिल्या अधिवेशनात त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांचे स्वागत केले. सरकार स्थापनेनंतर आपल्या मतदारसंघातील काम असो किंवा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री ते विविध मंत्र्यांना थेट स्वतः भेटून प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. अगदी केंद्र सरकारच्या  राज्य सरकारला अडचणीत आणणाऱ्या मुद्द्यांवर सुप्रिया सुळे परखडपणे भूमिका मांडतात.

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सर्व मंत्र्यांचे जनता दरबार होतात; पण सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पक्षाचा एक नेतादेखील आता जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध असणार आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कार्यालयात दर मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे काम असो किंवा आपल्या जिल्ह्यातील कोणतंही काम सामान्य जनता, आमदार ते अधिकारी एक तर शरद पवार, जयंत पाटील यांच्याकडे जातात नाही तर अजित पवार यांच्याकडे; पण आता सुप्रिया सुळेही त्यांच्या बरोबरीने दिसत आहेत. अनेक आमदारदेखील सुप्रिया सुळे यांच्याशी मतदारसंघातील विविध समस्या, प्रश्न याबाबत चर्चा करतात. पक्षात सुप्रिया सुळे यांची वाढती सक्रियता हा म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER