कोल्हापुरात राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

NCP Flag

कोल्हापूर : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून, त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण नुकत्याच कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेल्या. त्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

तसेच पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याबरोबर स्वबळावर महापौर करण्यासाठी आतापासून तयारीला लागा, असे त्या म्हणाल्या. भाजपकडून या निवडणुकीची तयारी सुरू आहे. निवडणुकीत कोणते मुद्दे लावून धरायचे याबाबत कार्यकर्ते व पक्षातील नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. यात ताराराणी आघाडी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवते की भाजपबरोबर आघाडी करून निवडणूक लढविते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसचे नेते व गृह राज्यमंत्री सतेज पाटील तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सध्या महापालिकेत सत्ता आहे.

येत्या महापालिका निवडणुकीत या दोघांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील ताकदीने उतरणार असून त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठेचे आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पक्षाचे २०१० च्या निवडणुकीत २५ सदस्य निवडून आले होते. २०१५ च्या निवडणुकीत हीच संख्या १५ झाली. त्यामुळे आताच्या निवडणुकीत ते आपली ताकद पणाला लावतील, हे स्पष्ट आहे.