राष्ट्रवादीचे पुढील लक्ष्य उल्हासनगर; दिग्गज नेते पप्पू कलानी सक्रिय, भेटीगाठी वाढल्या

Maharashtra Today

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची समजली जाणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या २००२च्या निवडणुकीत पप्पू कलानी यांनी राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली होती. तुरुंगामधून निवडून येण्याची हॅटट्रिकदेखील पप्पू कलानी यांच्याच नावावर आहे. उल्हासनगर म्हटले की पप्पू कलानी असे समीकरण बनले आहे. कलानींची गुन्हेगारी पार्श्वभूमी वगळता शहराचा विकास हे त्यामागील कारण आहे. दरम्यान, पप्पू कलानी (Pappu Kalani)सध्या पॅरोलवर असून, ते आता सक्रिय झाले आहेत.

मागच्या महिन्यात ज्योती कलानी यांच्या निधनाच्या निमित्ताने १४ दिवसांच्या पॅरोलवर आलेले पप्पू कलानी यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आता कोरोनामुळे त्यांची ४५ दिवस अर्थात दीड महिन्यांसाठी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जुन्या समर्थकांचे दुरावलेले हितसंबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित करून येणाऱ्या पालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे बदलण्याचे प्रयत्न पप्पू कलानी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलानी पॅरोलवर आल्याने त्यांची भेट घेण्यासाठी हितचिंतक, विविध राजकीय पक्षाचे नेते, राष्ट्रवादी सोडून गेलेले नगरसेवक कलानी यांच्या महालावर गर्दी करू लागले आहेत. राजकीय समीकरण बदलण्यासाठी कलानी यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत.

पप्पू कलानी हे २०१३ पासून इंदर बठीजा हत्याकांड प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी त्यांनी रिक्षा युनियन नेते मारुती जाधव हत्याप्रकरणी ९ वर्षे कारागृहात काढली होती. २००१ मध्ये त्यांना जामीन मिळताच उल्हासनगरात ‘केर आयो पप्पू शेर आयो’ हे गाणे गाजले होते. दरम्यान, पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याची ‘टीम ओमी कलानी (टीओके)’ महाविकास आघाडीसोबत आहे. मागच्या वर्षी भाजपासोबत सत्तेत असलेल्या ओमीने, भाजपने विधानसभेत तिकीट नाकारल्याने महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करून महापौर निवडणुकीत वचपा काढला होता. त्यामुळेच भाजपला अवघ्या अडीच वर्षांतच महापालिकेच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. आता पप्पू कलानी दीड महिन्यांकरिता शहरात असून ते पुन्हा आपला जुना पक्ष असलेल्या राष्ट्रवादीशी जवळिक साधतात की, महाविकास आघाडीसोबत राहण्यासाठी ओमीला सूचना देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button