राष्ट्रवादी नाथाभाऊंचे समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी – चंद्रकांत पाटील यांचा टोमणा

Eknath Khadse - Chandrakant Patil

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीत खडसे यांना लगेच मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा होती. पण, तसे झाले नाही. खडसेंच्या पक्षप्रवेशानंतरही मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजण आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील, असे सांगून शरद पवार यांनी हा विषय निकाली काढला.

यावर राष्ट्रवादी आणि खडसे, दोघांनाही टोमणा मारताना भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत – राष्ट्रवादी नाथाभाऊंचे समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत, समाधान मानण्यावर असते. काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरीही समाधानी होतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज दुपारी २ वाजता खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. त्या प्रवेशालाच दोन तास लागले आता पाहू काय होते.

भाजपाने नाथाभाऊंना पुष्कळ दिले. त्यांच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते भाजपात (BJP) थांबले नाहीत. राष्ट्रवादी काय देते ते पाहू. ‘तुमचे समाधान होईल’ असे आश्वासन मिळाल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरुन बाहेर पडलेत. आता समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि डेअरीमिल्कही!

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामध्ये अनेक नेते अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या. बऱ्याच वावड्यानंतर, खडसेंच्या पक्षप्रवेशानंतरही मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजण आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील, असे सांगून शरद पवार यांना हा विषय निकाली काढावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER