राष्ट्रवादीचे मिशन पुणे : शहर संघटनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता, चेतन तुपे यांचा राजीनामा

Chetan Tupe - NCP - Maharashtra Today

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे शहाराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. ऑगस्ट २०१८ पासून ते शहराध्यक्ष म्हणून काम बघत होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून शहरात संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात झाली असून तुपे यांचा राजीनामा ही त्याची सुरुवात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

शहराध्यक्ष बदलाचा निर्णय दिड वर्ष लांबणीवर पडला होता. दरम्यान पक्षातील दिग्गज नगरसेवकांचे शहाराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडावी याकरिता जोरदार प्रयत्न सुरू होते. तुपे यांच्या राजीनाम्यानंतर हे इच्छुक पुन्हा वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आले आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक दीपक मानकर, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम आदींचा यामध्ये समावेश आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

२०१७ साली पालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेत असलेला राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. गेल्या पाच वर्षात भाजपाला प्रकल्प आणि विकासमकामे पूर्ण करण्यात आलेले अपयश पाहता राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्याची संधी असल्याचे बोलले जात आहेत. शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर महत्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी आजी माजी दिग्गज आणि पालिकेतील महत्वाची पदे भूषविलेले नगरसेवक इच्छुक आहेत. यामध्ये एससी, ओबीसी आणो ओपन अशा तीनही गटातील इच्छुकांचा समावेश आहे. त्यामुळे शहराध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे. खासदार एड. वंदना चव्हाण यांनी सलग आठ वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले होते. महिलाही पक्षाची धुरा सक्षमपणे सांभाळू शकतात. त्यामुळे शहाराध्यक्षपद महिलेला मिळावे अशी मागणीही काही महिला नगरसेवकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button